अफ्रिकेतील देशांमधून मुंबईत दाखल झालेल्यांपैकी आणखी ३ प्रवाशांना करोनाची बाधा झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे आता मुंबईत दक्षिण अफ्रिकेतून आलेले एकूण ४ करोनाबाधित प्रवासी झालेत. त्यांना मरोळच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आफ्रिकेसह अन्य जोखमीच्या देशातून येणाऱ्या प्रवाशांचा शोध पालिकेने सुरू केला आहे. यात पहिल्या टप्प्यामध्ये १२ नोव्हेंबरपासून आफ्रिकेतून ४६६ प्रवाशी मुंबईत दाखल झाले. यातील १०० मुंबईत राहणारे असून पालिका त्यांच्या करोना चाचण्या करत आहे. अंधेरीत वास्तव्यास असणाऱ्या एका प्रवाशाला करोनाची बाधा झाल्याचे मंगळवारी आढळले. यानंतर बुधवारी (१ डिसेंबर) आणखी ३ प्रवासी बाधित असल्याचे आढळले.
प्रवाशाला ओमायक्रॉनमुळे बाधा झाली असण्याची शक्यता कमी
अंधेरीत राहणाऱ्या प्रवाशाच्या एस जनुकीय घटकाचा वापर केलेली आरटीपीसआर चाचणी मंगळवारी (३० नोव्हेंबर) केली गेली. यात एस जनुकीय घटक उपलब्ध असल्याचे आढळले होते. त्यामुळे त्याला ओमायक्रॉनमुळे बाधा झालेल्या असण्याची शक्यता फार कमी आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
अन्य तीन प्रवाशांचीही एस जनुकीय आरटीपीसीआर चाचणी
बाधित असलेल्या आणखी ३ प्रवाशांच्या एस जनुकीय आरटीपीसीआर चाचण्या बुधवारी केल्या आहेत. याचे अहवाल बुधवारी रात्री किंवा गुरुवारी सकाळी येण्याची शक्यता आहे. सध्या तरी एकही ओमायक्रॉनचा रुग्ण मुंबईत आढळलेला नाही, असे काकाणी यांनी स्पष्ट केले.
जनुकीय चाचण्या पुढील टप्प्यांमध्ये
डोंबिवलीत आढळलेल्या बाधित प्रवाशासह या परदेशातून आलेल्या बाधित रुग्णांचे नमुने जनुकीय चाचणीसाठी शनिवारीच पाठविले असून याचे अहवाल येत्या शनिवारी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता नव्याने आढळलेल्या या बाधितांचे नमुने पुढच्या टप्प्यातील जनुकीय चाचण्यांमध्ये दिले जातील. त्यामुळे याबाबत खात्री होण्यास आणखी काही दिवस वाट पाहावी लागेल, असे काकाणी यांनी सांगितले.