मुंबई : सुशोभीकरण प्रकल्पाला आधीच विलंब झालेला असताना या प्रकल्पातील आणखी तीन विभागांची निविदाही वादात सापडली आहे. यापूर्वी अंधेरी, मालाड येथील तीन निविदा रद्द करून पुनर्निविदा काढण्याची वेळ आली होती. त्यापाठोपाठ आता दहिसर, कांदिवली, बोरिवली येथील निविदा प्रक्रियेत संगनमत झाल्याचा आरोप होऊ लागला आहे.  मुंबईची प्रतिमा उंचावण्यासाठी पालिकेने संपूर्ण महानगराच्या सौंदर्यीकरणाचा प्रकल्प हाती घेतला असला तरी या प्रकल्पाला अद्याप सुरूवात झालेली नाही. पालिका प्रशासनाने या प्रकल्पासाठी रीतसर निविदा राबवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आधीच अंधेरी आणि मालाडमधील सुशोभीकरणाच्या कामांच्या निविदा रद्द करण्याची वेळ आली आहे. त्यातच आता बोरिवली, कांदिवली, दहिसर येथील कामांच्या निविदा प्रक्रियाही वादात सापडल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या तिन्ही विभागांनी वाहतूक बेटाचे सुशोभीकरण, पुलाखालील जागा सुशोभित करणे, पदपथाचे काँक्रीटीकरण, रस्त्यावरील दिवे, भिंतीची रंगरंगोटी या कामासाठी निविदा मागवल्या होत्या. ही कामे सहा ते दहा कोटी रुपयांची आहेत. मात्र या तिन्ही विभागांमध्ये कंत्राटदारांनी २२ ते ३१ टक्के कमी दराने बोली लावली आहे. या दरामध्ये ही कामे होणे शक्य नसल्याचा आरोप भाजपचे माजी नगरसेवक कमलेश मिश्रा यांनी केला आहे. कंत्राट मिळवण्यासाठी कमी दर लावले असल्याचा आरोप करीत यादव यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे व दक्षता विभागाकडे लेखी तक्रार केली आहे.

काळय़ा यादीतील कंत्राटदार पात्र

या कामांसाठी एका ठरावीक कंत्राटदाराने तिन्ही विभागांत बोली लावली असूून तो सर्वात कमी बोली लावणारा कंत्राटदार आहे. मात्र जिजामाता उद्यानातील पेंग्विन कक्ष तयार करण्याच्या कामात त्याला काळय़ा यादीत टाकण्यात आले होते. तसेच प्राण्यासाठी अधिवास तयार करण्याचे कंत्राट त्याला देण्याचा घाट घातलेला असताना अचानक ती निविदाही रद्द करण्यात आली होती. त्यामुळे या कंत्राटदाराशी अधिकाऱ्याचे साटेलोटे असल्याचा आरोप यादव यांनी पत्रात केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three more tenders mumbai beautification project dispute bjp alleges collusion tenders ysh