पुण्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या कमी तीव्रतेच्या साखळी बॉम्बस्फोटांमागे इंडियन मुजाहिदीन आणि फयाझ कागझी याच्या नेतृत्त्वाखालील एक स्थानिक दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख राकेश मारिया यांनी गुरुवारी जाहीर केले. या प्रकरणी आणखी तिघांना अटक करण्यात आली असून आता या बॉम्बस्फोट प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या सात झाली आहे. या तिघांनाही १ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्यांच्याकडून तीन संगणक, एक लॅपटॉप आणि ७.६५ एमएमचे एक पिस्तुल व त्याच्या चार गोळ्या हस्तगत करण्यात आल्या.
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पुणे शहरातील प्रमुख ठिकाणी अत्यंत कमी तीव्रतेचे स्फोट घडवण्यात आले होते. या स्फोटांमुळे मनुष्यहानी झाली नव्हती. मात्र हे स्फोट म्हणजे पुढील मोठय़ा हल्ल्याची रंगीत तालीम असल्याचे त्यावेळी बोलले जात होते. मात्र दिल्लीच्या विशेष पथकाने कारवाई करीत फिरोज सय्यद, इरफान लांडगे, इम्रान खान आणि असद खान यांना याआधीच अटक केली होती. त्यानंतर या चौघांना महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या ताब्यात देण्यात आले होते.
एटीएसने सईद आरीफ उर्फ कशिफ बियाबानी, मुनीब इक्बाल मेमन आणि फारूख बागवान यांना बुधवारी अटक केली. कशिफला एटीएसने औरंगाबादहून अटक केली असून मुनिब आणि इक्बाल यांना पुण्यात अटक करण्यात आली. कशिफ हा इंडियन मुजाहिदीनसाठी तरुणांना फितवत असल्याने त्याची अटक महत्त्वाची मानण्यात येत आहे. कशिफचा हात जर्मन बेकरी स्फोटातही होता. त्याचा संपर्क फयाझ कागझीशी होता. झबिउद्दीन अन्सारीने दिलेल्या जबानीत कशिफचे नाव समोर आले होते. दहशतवाद्यांच्या तालमीत तयार होण्यासाठी कशिफ फयाझला मुले पाठवत असे. मराठवाडा, पुणे आणि अहमदनगर या भागांत कशिफने आपले जाळे पसरले होते, अशी माहिती मारिया यांनी दिली.
मुनीब आणि इक्बाल या दोघांना बॉम्बस्फोटांची पूर्णपणे माहिती होती. त्याचप्रमाणे त्या दोघांनीही फिरोझ सय्यद याला खोटी कागदपत्रे बनवून देण्यात मदत केली होती. फिरोझने हे सर्व बॉम्ब १ ऑगस्ट रोजी पुण्यात ठेवले होते. त्याने कासारवाडी येथे एक घर भाडय़ाने घेतले होते. या घरातच बॉम्ब तयार करण्यात आले. त्याचप्रमाणे खोटी ओळखपत्रेही येथेच तयार करण्यात आल्याची माहिती मारिया यांनी दिली. रियाझ आणि इक्बाल भटकळ यांनी बॉम्बस्फोटाची ठिकाणे निश्चित केली. त्यानंतर फिरोझने या ठिकाणी बॉम्ब ठेवण्याचे काम केले, असे ते म्हणाले.

Story img Loader