मुंबई : मुंबई महानगरपालिकेने आतापर्यंत ११ सीबीएसई शाळा सुरू केल्या असून गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना या शाळांमध्ये शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. मुंबई महानगरपालिकेने या शैक्षणिक वर्षापासून आणखी तीन सीबीएसई शाळा मुंबईत सुरू केल्या आहेत. यापैकी दोन शाळा चेंबूरमध्ये, तर एक शाळा कांदिवलीत आहे. चेंबूरमधील महानगरपालिकेच्या सीबीएसई शाळांची संख्या तीन झाली आहे.
मुंबई महानगरपालिकेने २०२० मध्ये जोगेश्वरी पूर्व येथील पूनमनगरमधील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये पहिली सीबीएसईची शाळा सुरू केली. या शाळेला मिळालेला प्रतिसाद पाहून महानगरपालिकेने आर्थिकदृट्या दुर्बल गटातील विद्यार्थ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून मुंबई अन्य ठिकाणी सीबीएससीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. महानगरपालिकेने २०२१ मध्ये आणखी दहा ठिकाणी सीबीएसई शाळा सुरू केल्या. तसेच आयसीएसई, आयबी आणि केंब्रीज आयजीसीएसई या बोर्डांची प्रत्येकी एक शाळा सुरू केली. या शाळांना वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन गेल्यावर्षी महानगरपालिकेने सीबीएसई शाळेतील छोटा शिशू व बालवाडी वर्गाची एकेक तुकडी वाढवली होती. त्यामुळे ९६० जागा वाढल्या होत्या. मात्र तरीही सीबीएसई शाळांची मागणी वाढत असून मुंबईत आणखी सीबीएसई शाळा सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे.
हेही वाचा >>> १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचं मोठं वक्तव्य…
महानगरपालिकेच्या शाळांमध्ये केंद्रीय व आंतराष्ट्रीय मंडळाच्या शाळा सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांचा ओघ प्रचंड वाढला आहे. अन्य मंडळांच्या खाजगी शाळांचा खर्च परवडत नसल्यामुळे सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील मुलांना या शाळांमध्ये जाता येत नाही. त्यामुळे महानगरपालिकेच्या सीबीएसई, आयसीएसई आणि आंतरराष्ट्रीय मंडळाच्या शाळांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून मग लॉटरी काढली जाते. त्यामुळे या शाळांची संख्या वाढवण्याचा महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचा प्रयत्न होता. त्यानुसार प्रत्येक प्रशासकीय विभागात किमान एक सीबीएसई शाळा सुरू करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. मात्र या शैक्षणिक वर्षापासून तीन नवीन शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महानगरपालिकेच्या सीबीएसई शाळांची संख्या १३ झाली आहे.
या तीन ठिकाणी सीबीएसईच्या नवीन शाळा
१) मुंबई पब्लिक स्कूल, आणिक गाव, जिजामाता नगर, चेंबूर पश्चिम
२) मुंबई पब्लिक स्कूल, एम. जी क्रॉस रोड, साईनगर, कांदिवली पश्चिम
३) मुबई पब्लिक स्कूल, आशिष तलाव, वडवली, आरसीएफ, चेंबूर
सध्या या शाळांमध्ये सीबीएसईची शाळा
भवानी शंकर रोड पालिका शाळा, काणेनगर मनपा शाळा, प्रतीक्षानगर मनपा शाळा, दिंडोशी मनपा शाळा, जनकल्याण मनपा शाळा (मालाड), तुंगा व्हिलेज शाळा (कु र्ला), राजावाडी मनपा शाळा (विद्याविहार), अझीझबाग मनपा शाळा (चेंबूर), हरियाली व्हिलेज मनपा शाळा (विक्रोळी पूर्व), मिठागर शाळा (मुलुंड पूर्व)