लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: सेंट जाॅर्जेस रुग्णालयातील अद्ययावत शस्त्रक्रियागृह आणि रक्तशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन झाल्यानंतर आता पुढील दोन आठवड्यांमध्ये सुघटनशल्यशास्त्र, मूत्रविज्ञानशास्त्र, नेत्रशल्यशास्त्र हे तीन विभाग सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे भविष्यात सेंट जॉर्जेस रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना अधिक चांगल्या आरोग्य सेवा मिळू शकतील.
करोनाकाळात सेंट जॉर्जेस रुग्णालय पूर्णपणे करोनाला समर्पित रुग्णालयात रुपांतरित करण्यात आले होते. त्यामुळे रुग्णालयातील अनेक विभाग बंद करण्यात आले होते. मात्र करोना नियंत्रणात आल्यानंतर रुग्णालयातील सर्व विभाग हळूहळू पुन्हा सुरू करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सेंट जॉर्जेस रुग्णालयात अद्ययावत शस्त्रक्रियागृहाचे बांधकाम हाती घेण्यात आले होते. तसेच रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना मोफत किंवा माफक दरामध्ये रक्तशुद्धीकरणाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी १२ खाटांचे रक्तशुद्धीकरण केंद्र सुरू करण्यात आले. सरकारी रुग्णालयामध्ये अशाप्रकारे अद्ययावत व बाहेरील रुग्णांसाठी सुरू करण्यात आलेले राज्यातील हे पहिले रक्त शुध्दीकरण केंद्र आहे.
रक्तशुद्धीकरण केंद्र आणि शस्त्रक्रियागृहापाठोपाठ आता सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये सुघटनशल्यशास्त्र, मूत्रविज्ञानशास्त्र, नेत्रशल्यशास्त्र हे तीन विभाग सुरू करण्यात येणार आहेत. सुघटनशल्यशास्त्र विभाग पुढील आठवड्यात सुरू करण्यात येणार आहे. सेंट जॉर्जेस रुग्णालयाच्या सुघटनशल्यशास्त्र विभागातील डाॅ. रजत कपूर यांनी काही वर्षांपूर्वी महिलेचे पुरुषामध्ये रुपांतर करण्याची अवघड शस्त्रक्रिया केली होती. त्यामुळे सेंट जॉर्जेस रुग्णालयाच्या सुघटनशल्यशास्त्र विभागाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. त्याचप्रमाणे मूत्रविज्ञानशास्त्र विभाग पुढील दोन आठवड्यांमध्ये सुरू होणार आहे. तर नेत्रशल्यशास्त्र विभाग सुरू करण्यासाठी आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर, प्राध्यापक आणि निवासी डॉक्टर लवकरच उपलब्ध करण्यात येतील, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन आणि विभागाच्या सचिव अश्विनी जोशी यांनी दिल्याची माहिती सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. विनायक सावर्डेकर यांनी दिली.
स्त्री रोग आणि बालरोग विभाग पूर्णपणे सुरू होणार
सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये स्त्री रोग आणि बालरोग विभागाचा फक्त बाह्यरुग्ण विभाग कार्यरत होते. मात्र आता अद्ययावत शस्त्रक्रियागृह सुरू झाल्यानंतर या विभागाचा आंतररुग्ण विभागही सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असणारे प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि निवासी डॉक्टर तातडीने उपलब्ध करण्यासंदर्भात जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांना केलेली विनंती त्यांनी मान्य केली आहे. लवकरच या विभागासाठी डॉक्टर उपलब्ध करण्यात येणार आहेत.