लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : मालाड येथील हाजी बापू मार्गावरील गोविंद नगर येथील बांधकाम सुरू असलेल्या नवजीवन या इमारतीच्या २० व्या मजल्याच्या छताचा काही भाग गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास अचानक कोसळला. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले आहेत.
मालाड येथे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत (झोपु) बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू होते. गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास अचानक २० व्या मजल्याच्या छताचा भाग कोसळला. बांधकामस्थळी काम करणारे काही कामगार मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्य हाती घेतले.
या दुर्घटनेत जखमी झालेल्या सहा जणांना मातीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढून नजिकच्या एम. डब्ल्यू देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. सध्या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दोघांवर उपचार सुरू आहेत. तर, एकाला ऑर्थोपेडिक विभागात दाखल करण्यात आले आहे. अद्याप जखमी व मृत कामगारांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत.