मुंबई : सर एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयाच्या कार्डियाक सर्जरी विभागाचे संचालक डॉ. अन्वय मुळ्ये आणि त्यांच्या तज्ञ टीमने पश्चिम भारतात पहिल्यांदाच दुहेरी ब्रिजिंग तंत्राचा वापर करून हृदय विकाराने ग्रस्त तीन गंभीर रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली. या अत्याधुनिक तंत्राच्या वापरामुळे हृदयाचे डावे व उजवे कुपिक (वेंट्रिकल्स) कार्यक्षम होण्यासाठी मदत झाली आणि रुग्णांना नवीन जीवन मिळाले. पश्चिम भारतातील पहिली दुहेरी ब्रिजिंग हार्ट सर्जरी असून डॉ अन्वय मुळे यांनी या सर्व शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या तिन्ही रुग्णांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना तातडीने उपचाराची आवश्यकता होती. यातील एक मुंबईतील रोहित (नाव बदललेले) हा गेल्या १० वर्षांपासून हृदयाशी संबंधित आजाराने त्रस्त होता. त्याच्यावर दुहेरी ब्रिजिंग तंत्राचा वापर करून हृदयाच्या दोन्ही बाजूंना मदत करण्यासाठी व्हेंट्रिक्युलर असिस्ट डिव्हाइस लावण्यात आले. या तिन्ही रुग्णांना हार्ट फेल्युअर क्लिनिकमध्ये दाखल केल्यानंतर त्यांच्या सविस्तर वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. ज्यामध्ये राईट हार्ट अँटीबॉडी चाचण्या तसेच इतर अत्याधुनिक चाचण्या करण्यात आल्या.

हेही वाचा – Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर मुंबईतून १ हजार ९६३ बॅनर्स, झेंडे काढले, ‘या’ वॉर्डात सर्वाधिक बॅनर्स

दुसरा रुग्ण, अमित (वय ४१ नाव बदलले) यांना सुरुवातीला फुफ्फुसात द्रव साचल्यामुळे हृदयावर ताण आला होता. डॉक्टरांनी दिलेल्या उपचारांमुळे आता तो बरा झाला आहे.

तिसऱ्या रुग्णाचे वय फक्त १७ वर्षे होते आणि चाचण्यांदरम्यान हृदयाशी संबंधित समस्या अचानक उघडकीस आल्या. त्याच्या वडिलांनी सांगितले, आम्हाला काहीच कल्पना नव्हती. मात्र, डॉक्टरांनी त्याला वेळेवर डिव्हाइस (व्हीएडी) लावला.

मुंबईतील रोहित (नाव बदलले) हा मागील दहा वर्षांपासून हृदयाशी संबंधित आजारांशी लढत होते. मात्र, यावर्षी त्यांच्या हृदयाची कार्यक्षमता केवळ १० टक्के इतकीच होती. अशा गंभीर स्थितीत डॉक्टरांनी दुहेरी ब्रिजिंग तंत्राचा वापर केला, ज्यामध्ये हृदयाच्या दोन्ही बाजूंना मदत करण्यासाठी व्हेंट्रिक्युलर असिस्ट पर्याय निवडला जात असे, मात्र यावेळी संपूर्णपणे नवे तंत्र वापरण्यात आले.

गेल्या तीन दशकाहून अधिक काळ हृदयशस्त्रक्रियेचा अनुभव असेलेल्या डॉ अन्वय मुळे यांनी आतापर्यंत १५ हजारहून अधिक यशस्वी बायपास शस्त्रक्रिया केल्या आहेत. तसेच १६० हून अधिक हार्ट ट्रान्सप्लांट म्हणजे हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या आहेत.

हेही वाचा – मुंबई : मालमत्तेच्या वादातून ३६ वर्षीय व्यक्तीची हत्या, दोघांना अटक

या शस्त्रक्रियेविषयी डॉ मुळे म्हणाले की, रुग्णांना स्थिर ठेवण्यासाठी सुरुवातीला (लेफ्ट व्हेंट्रिक्युलर असिस्ट डिव्हाइस) बसवण्यात आले. मात्र, परिस्थिती गंभीर होत गेली तसतसे (राईट व्हॅट्रिक्युलर असिस्ट डिव्हाइस) जोडावे लागले.

एका प्रकरणात ‘इसीएमओ’ प्रणालीला बायव्हेंट्रिक्युलर सपोर्ट सिस्टममध्ये रुपांतरित केले. दुहेरी ब्रिजिंग तंत्राच्या वापरामुळे हृदय प्रत्यारोपणासाठी योग्य प्रतीक्षा दरम्यान रुग्णांचे प्राण वाचवणे शक्य झाले आणि पश्चिम भारतातील हृदय उपचार क्षेत्रात एक नवा अध्याय लिहिला गेला.

डॉ. तल्हा मिरन, डॉ निरज कामत, डॉ संदीप सिन्हा, डॉ आशिष गौर व डॉ रोहित बुणगे यांचे या शस्रक्रियेसाठी मोलाचे सहकार्य मिळाल्याचे डॉ. अन्वय मुळे यांनी आवर्जून सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three people were saved by heart surgery a rare surgery in western india mumbai print news ssb