मुंबई : जोगेश्वरी येथे रेल्वेच्या हद्दीत बांधण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवरील तोड कारवाईदरम्यान बुधवारी तणावाचे वातावरण निर्माण झाले. कारवाईसाठी तैनात करण्यात आलेल्या पोलीस पथकावर नागरिकांनी दगडफेक केली आहे. पोलिसांनीही बचावासाठी सौम्य लाठीचार्ज केला असून त्या झटापटीत तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. एकाच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

रेल्वे प्रशासनाने जोगेश्वरी परिसरातील अनधिकृत झोपडीधारकांना बांधकाम हटविण्याबाबत पूर्वीच नोटीस बजावली होती. अनेकदा नोटीस बजावूनही नागरिकांकडून रेल्वे प्रशासनाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे संबंधित झोपड्यांवर तोडक कारवाई करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. त्यानुसार, रेल्वे कर्मचारी आणि पोलिसांचे पथक बुधवारी घटनास्थळी दाखल झाले. राहते घर तोडले जाण्याच्या भीतीने नागरिकांनी आंदोलन पुकारून निषेध केला. मात्र, त्याचा फारसा परिणाम होत नसल्याचे लक्षात येताच आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक करायला सुरुवात केली. त्यामुळे प्रकरण चिघळले. पोलिसांनाही संरक्षणासाठी आंदोलनकर्त्यानावर सौम्य लाठीचार्ज केला. या झटापटीत तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यापैकी एका पोलिसाच्या डोक्याला दगड लागल्याने त्यांना नजीकच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये दोन महिला पोलिसांचा समावेश असून त्या किरकोळ जखमी झाल्या. दरम्यान, घटनास्थळी आणखी पोलीस तैनात करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी २० ते २५ जणांना ताब्यात घेतले आहे.

Story img Loader