भंडारा जिल्ह्य़ातील मुरमाडी गावात मृतदेह आढळलेल्या तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झालेला नसल्याचा अभिप्राय तज्ज्ञांनी दिला आहे. या तिघींना विहीरीत कोणी ढकलले असावे किंवा हा अपघात असण्याची शक्यता गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी व्यक्त केल्यावरही पोलिसांनी या  तपास योग्यपणे केला नाही, असा आक्षेप विरोधकांनी घेतल्याने अखेर या प्रकरणाची सीबीआय चौकशीची घोषणा गृहमंत्र्यांनी सोमवारी विधानसभेत केली.
तीन अल्पवयीन मुलींच्या मृत्यूप्रकरणी भाजपचे स्थानिक आमदार नाना पटोले यांनी उपस्थित केलेल्या चर्चेत विरोधी सदस्यांनी पोलिसांच्या तपासावर टीका केली.पुरेशी खबरदारी न घेण्यात आल्याने हे मृतदेह सडले आणि तपासावर  परिणाम झाल्याचा आरोप पटोले यांच्यासह विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस, आशिष जयस्वाल, नरेंद्र भांडेकर यांनी केला.
गृहमंत्री पाटील यांनी हे आरोप फेटाळून लावले.  शवविच्छेदनात तीन मुलींवर बलात्कार झाल्याचा अहवाल आला होता. पण तिघींचा व्हिसेरा नवी दिल्ली आणि मुंबईत पाठविण्यात आला असता बलात्कार झालेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञ डॉ. डोग्रा यांनीही बलात्कार झालेला नसल्याचे कळविले आहे, असे पाटील यांनी सांगितले.

Story img Loader