मुंबई : ठाण्यातील आनंद नगर येथील स्वामी विवेकानंद चौक – ठाणे स्थानक (पू) कोपरीदरम्यानच्या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले असून या मार्गावरून धावणारी, ठाणे शहर आणि मुंबई पश्चिम उपनगराला जोडणारी बेस्ट बस मार्ग क्रमांक ‘सी ७००’चे अप आणि डाऊन दिशेकडील तीन थांबे एका महिन्यासाठी वगळण्यात आले आहेत. त्यामुळे थेट ठाणे रेल्वे स्थानक (पू) येथून प्रवाशांना बेस्ट बसची सेवा मिळू शकणार नाही. परिणामी, प्रवाशांचे प्रचंड हाल होण्याची चिन्हे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बेस्ट उपक्रमाचा बस मार्ग क्रमांक ‘सी ७००’ ठाणे रेल्वे स्थानक (पू) ते मागाठाणे आगार, बोरिवली (पू) यादरम्यान धावते. ठाणे आणि बोरिवली या दोन महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या या बसला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद असतो. तसेच ही बस ज्ञानसाधना महाविद्यालय, तीन हात नाका, घोडबंदर व ठाण्यातील महत्त्वाच्या ठिकाणी थांबा घेत, भाईंदर (पू) काशिमीरा (मिरारोड, पू), दहिसर (पू), बोरिवली (पू) येथील वर्दळीच्या ठिकाणांहून मार्गस्थ होते. त्यामुळे या बसचा प्रवाशांना खूप फायदा होतो. मात्र स्वामी विवेकानंद चौक – ठाणे स्थानक (पू) कोपरीदरम्यानच्या भास्कर पाटील रस्त्याचे काम ठाणे महानगरपालिकेने हाती घेतले आहे. हे काम २७ जुलै ते २४ ऑगस्टदरम्यान करण्याचे नियोजन असून या काळात बस मार्ग क्रमांक ‘सी ७००’च्या अप आणि डाऊन या दोन्ही दिशेकडील बस स्वामी विवेकानंद चौक (बारा बंगला) येथपर्यंतच चालवण्यात येणार आहे. त्यामुळे बस मार्ग क्रमांक ‘सी ७००’चे सिद्धार्थ नगर, गावदेवी मंदिर, ठाणे रेल्वे स्थानक (पू) हे तीन थांबे वगळले गेले आहेत, अशी माहिती बेस्ट उपक्रमातील अधिकाऱ्यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three stops of thane magathane best bus were skipped mumbai print news ssb