ग्राहकांच्या गर्दीनंतर व्यापारी महासंघाचा निर्णय
किरकोळ बाजारातील भाजी विक्रेत्यांच्या दांडगाईला आवर बसावा यासाठी राज्य सरकारने मुंबई, ठाणे परिसरात सुरू केलेल्या स्वस्त भाजी केंद्रांवर ग्राहकांची अक्षरश: झुंबड उडू लागली असून या केंद्रांवर पुरवली जाणारी सुमारे दहा हजार किलो भाजी कमी पडू लागली आहे. त्यामुळे आज, गुरुवारपासून आणखी तीन हजार किलो भाजीचा पुरवठा वाढविण्याचा निर्णय बुधवारी भाजीपाला व्यापारी महासंघाने घेतला. दरम्यान, स्वस्त भाजी केंद्रांवरील भाज्यांचे दर कमी करण्यासाठी गृहिणी घासाघीस करत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळल आहे.
मंत्रालय, मुलुंड, कळवा या केंद्रांवर ही जादा भाजी पाठवली जाणार आहे. दरम्यान, नवी मुंबईत नेरुळ, ऐरोली आणि ठाण्यात तब्बल तीन ठिकाणी स्वस्त भाजी केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव तयार असून आठवडाभरात ती कार्यान्वित केली जातील, अशी माहिती एपीएमसीच्या भाजीपाला बाजाराचे संचालक शंकर िपगळे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. ठाण्यातील काही मोठय़ा वसाहतींकडून स्वस्त भाजी विक्री केंद्र सुरू करावे, यासाठी अर्ज येऊ लागले आहेत. या वसाहतींची पाहणी करून तेथे केंद्र सुरू करण्यासाठी भाज्यांचा पुरवठा केला जाईल, असेही िपगळे यांनी स्पष्ट केले.
मुंबई, ठाण्यात तब्बल १० ठिकाणी मंगळवारपासून स्वस्त भाजी विक्रीची केंद्र सुरू करण्यात आली आहेत. एपीएमसीमधील घाऊक बाजारात विकला जाणारा उत्तम दर्जाचा भाजीपाला या केंद्रांमध्ये स्वस्त दरात विक्रीसाठी ठेवण्यात आल्याने मंगळवारी तासाभरात नऊ हजार किलो भाजीची विक्री झाली. मंत्रालय, मुलुंड येथील अपना बाजार तसेच कळव्यातील सहकार बाजारातील केंद्रांवर ग्राहकांची एकच झुंबड उडाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. एपीएमसी येथील घाऊक व्यापारी महासंघाच्या माध्यमातून प्रत्येक केंद्रावर एक हजार किलो भाजीचा पुरवठा करण्यात आला होता. दहा हजार किलो भाजीपैकी सुमारे नऊ हजार किलो भाजीची विक्री तासाभरातच झाल्यामुळे या केंद्रांवर भाजीचा पुरवठा कायम कसा ठेवता येईल, याचा विचार आता एपीएमसीने चालवला आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत स्वस्त भाजी विक्री केंद्रांवर कांदा, बटाटा वगळता सर्वच भाज्यांची १०० टक्के विक्री झाल्याची माहिती एपीएमसीचे उपसचिव अविनाश पाटील यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
किरकोळ बाजारात महागाई कायम
स्वस्त विक्री केंद्रांच्या माध्यमातून भाज्यांच्या दरांना अटकाव घालण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न असले तरी किरकोळ बाजारात भाज्या अद्यापही महाग आहेत. घाऊक बाजारात भाज्या स्वस्त झाल्याने किरकोळ बाजारात काही प्रमाणात दर कमी झाले असले तरी राज्य सरकारने सुरू केलेल्या स्वस्त भाजी केंद्रांच्या तुलनेत किरकोळीची भाजी अजूनही महागच आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई यांसारख्या शहरांमधील प्रमुख भाज्या मंडयांचा आढावा घेतला असता सरकारच्या हस्तक्षेपाला किरकोळ विक्रेते फारशी भीक घालत नाहीत, असेच सध्याचे चित्र आहे. गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत किरकोळीची भाजी काही प्रमाणात स्वस्त झाली असली तरी घाऊक बाजारातील दरांच्या तुलनेत हे दर आणखी स्वस्त असायला हवेत, असा दावा िपगळे यांनी केला.