मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात गेल्या महिन्यात जन्मलेल्या वाघाच्या चार बछडय़ांपैकी तिघांचा मृत्यू झाला, तर चौथ्यावर उपचार सुरू असून त्याला वाचविण्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोर मोठे आव्हान आहे.
राष्ट्रीय उद्यानातील श्रीवल्ली या वाघिणीने २५ मार्च रोजी चार बछडय़ांना जन्म दिला. त्यातील एकाचा त्याच दिवशी मृत्यू झाला. त्यानंतर दोन बछडय़ांचा मृत्यू झाला. २५ मार्च रोजी मृत्यू झालेल्या बछडय़ाला फुप्फुसांशी संबंधित समस्या असल्याचे सांगितले होते. तर त्यानंतर मृत्यू पावलेल्या बछडय़ांना आरोग्याशी संबंधित समस्या होत्या, असे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे वाघ आणि सिंह सफारीचे अधीक्षक विजय बारब्दे यांनी सांगितले. चौथ्याचे वजन कमी असल्यामुळे त्याच्यावर तत्काळ उपचार सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, श्रीवल्ली बछडय़ांना दूध पाजता येत नव्हते. त्यामुळे त्यांना पुरेसे दूध मिळाले नसावे आणि त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला असावा असे सूत्रांनी सांगितले. बछडय़ांचा जन्म नैसर्गिकरीत्या झाला होता. त्यादरम्यान कोणताही मानवी हस्तक्षेप करण्यात आला नव्हता. मात्र नंतर वाघिणीच्या व पिल्लांच्या देखभालीसाठी पिंजऱ्यात मानवाचा वावर वाढला. त्याचाच वाघिणीने ताण घेतला असावा, असेही बारब्दे यांनी सांगितले.
श्रीवल्लीचा प्रवास..
२०२२ मध्ये एका व्यक्तीवर हल्ला केल्यानंतर ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून श्रीवल्लीला चंद्रपूर संक्रमण शिबिरात नेण्यात आले आणि नंतर संजय गांधी
राष्ट्रीय उद्यानात स्थानांतरित करण्यात आले. त्यामुळे तिला बंदिस्त वातावरणात राहण्याची सवय नाही. अचानक
उद्यानात पिंजऱ्यात राहायला लागल्यामुळे ती तणावाखाली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे.