राजीनामे घेतल्याने राष्ट्रवादीच्या सर्वच मंत्र्यांमध्ये धाकधूक असली तरी तीन ते चार मंत्र्यांना नारळ देऊन त्याऐवजी नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाणार आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या मनाचा थांगपत्ता लागत नसल्याने वगळले जाण्याची भीती असलेल्या मंत्र्यांमध्ये चलबिचल सुरू आहे. राष्ट्रवादीच्या नव्या नेत्यांचा समावेश मंगळवारी मंत्रिमंडळात केला जाणार असला तरी काँग्रेसच्या मंत्र्यांचा विस्तार पुढे कधीतरी केला जाईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी स्पष्ट केले.
प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी आमदारकीची आपली शेवटची खेप असल्याने मंत्रिमंडळात समावेश करावा, असा फारच आग्रह धरला होता. त्यामुळे त्यांचा मंत्रिमंडळात समावेश निश्चित आहे.
कोणाला वगळले जाणार याबाबत सारेच अनिश्चित आहे. मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील पक्षाची सारी सूत्रे हातात घेतलेल्या शरद पवार यांनी साऱ्याच मंत्र्यांचे राजीनामे घेऊन पक्षातील नेत्यांना सूचक इशारा दिल्याचे मानले जाते. काही जणांना वगळावे किंवा काहींच्या समावेशाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार हे आग्रही होते. त्यातील किती नावे मान्य होतात याकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे.
सर्व २० मंत्र्यांचे राजीनामे घेतले असले तरी तीन किंवा चार जणांना प्रत्यक्ष वगळले जाईल, असे राष्ट्रवादीच्या सूत्राकडून सांगण्यात आले. पक्षाची डागळलेली प्रतिमा सुधारण्याकरिता कलंकित मंत्र्यांना वगळण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी गुलाबराव देवकर यांचा अपवाद वगळता अन्य कोणी वादग्रस्त मंत्र्याला वगळले जाण्याची शक्यता कमी आहे.
पिचड यांच्या समावेशामुळे डॉ. विजयकुमार गावित यांचे भवितव्य कठीण असल्याचे बोलले जात असले तरी नंदुरबारमध्ये काँग्रेसला शह देण्यात यशस्वी ठरलेल्या डॉ. गावित यांना दूर केले जाण्याची शक्यता कमी आहे. मंत्रिपदासाठी बराच काळ प्रतिक्षेत असलेल्या शशिकांत शिंदे आणि ठाण्यातील जितेंद्र आव्हाड यांचा समावेश केला जाईल, अशी चिन्हे आहेत. सचिन अहिर यांना बढती दिली जाण्याची शक्यता आहे.

काँग्रेसच्या मंत्र्यांचा विस्तार नाही
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांबरोबर काँग्रेसच्या कोटय़ातील तीन जागा भरणे किंवा विस्तार यापैकी काहीही होणार नाही, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी काँग्रेसच्या मंत्र्यांचा विस्तार होऊ शकतो, असेही चव्हाण यांनी सूचित केले.

मला इत्यंभूत माहिती नाही
राष्ट्रवादीतील नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करण्याचे धोरण असेल, काहींना लोकसभेसाठी संधी मिळणार असेल. मला यासंदर्भात इत्थंभूत माहिती नाही. त्यामुळे मी काही बोलू इच्छित नाही. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्याची अंमलबजावणी करणारा मी कार्यकर्ता आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.