लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : ‘अंधेरी पश्चिम – मानखुर्द मेट्रो २ ब’ मार्गिकेच्या संचलनासाठी आवश्यक असलेल्या गाड्यांपैकी तीन मेट्रो गाड्या नुकत्याच मुंबईत दाखल झाल्या आहेत. या गाड्या मंडाळे येथील डबलडेकर कारशेडमध्ये उभ्या करण्यात आल्या आहेत. या गाड्यांची लवकरच जोडणी करून चाचणी घेण्यात येण्याची शक्यता आहे.
‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’चा विस्तार ‘मेट्रो २ ब’अंतर्गत अंधेरी पश्चिम – मंडाळे असा करण्यात येत आहे. २३.६४ किमी लांबीच्या या मेट्रो मार्गिकेचे काम सध्या वेगात सुरू आहे. या मार्गिकेतील ३१ हेक्टर जागेवरील कारशेडच्या कामानेही गती घेतली आहे. या कारशेडमध्ये एका वेळेला ७२ गाड्या उभ्या करता येणार आहेत. या कारशेडचे अंदाजे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. आता या कारशेडमध्ये लाल आणि निळ्या रंगाच्या तीन मेट्रो गाड्या दाखल झाल्या आहेत. बंगळुरू येथील भारत अर्थ मूवर्स लिमिटेड कंपनी ‘मेट्रो २ ब’च्या गाड्यांची बांधणी करीत आहे.
आणखी वाचा-मुंबईत कचरा जाळणाऱ्यांवर कारवाईचा बडगा
‘मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकांवर धावणाऱ्या गाड्यांची बांधणी याच कंपनीने केली आहे. आता ‘मेट्रो २ ब’च्या तीन गाड्या मंडाळे कारशेडमध्ये दाखल झाल्या आहेत. आणखी काही गाड्या टप्प्याटप्प्याने मुंबईत दाखल होणार आहेत. मेट्रो गाड्या दाखल झाल्याने या मार्गिकेतील मंडाळे – चेंबूर असा टप्पा २०२४ मध्ये वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मंडाळे – चेंबूर टप्पा सुरू करण्यात येणार आहे का याबाबत एमएमआरडीएच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.