मुंबई: वर्क व्हिसामध्ये छेडछाड करून ओमान मार्गे कुवेतमध्ये जाणाच्या प्रयत्नात असलेल्या तीन महिलांना मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडवण्यात आले. पारपत्र विभाग व इमिग्रेशन विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी सहार पोलिसांनी तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
महिला प्रवासी विमला अक्काबटुला, नलिनी पैला व मार्था कंडेली या तीन महिला शुक्रवारी रात्री ओमानची राजधानी मस्कतला जात होत्या. तेथे तैनात विशेष शाखेच्या पोलिसांना संशय आल्यामुळे त्यांनी तपासणी केली असता तिन्ही महिला प्रवासी व्हिसावर ओमानला जात होत्या. त्यांची अधिक चौकशी केली असता कुवेतमध्ये वर्क व्हिसाच्या जुन्या नोंदी आढळल्या. तसेच नुकताच त्यांचा वर्क व्हिसा रद्द करण्यात आल्याचे दिसून आले.
पण त्यांच्या पारपत्रकावर अशा याबाबतच्या नोंदींमध्ये बदल करण्यात आल्याचे आढळले. त्यावर महिला ओमानमध्ये प्रवासी व्हिसावर जाऊन तेथून कुवेतमध्ये बेकायदेशिरपणे नोकरीसाठी जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांना सहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून याप्रकरणी पारपत्रामध्ये छेडछाड करून पारपत्र विभाग व इमिग्रेशन विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.