मुंबईः बोरिवली येथे सोमवारी दुपारी बेस्ट बस खाली तीन वर्षांची चिमुरडी चिरडली. या अपघातात गंभीर जखमी मुलीला कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बोरिवली रेल्वे स्थानक पूर्व येथून मागाठाणे आगाराच्या दिशेने जाणारी बस क्रमांक ए-३०१ दुपारी १ च्या सुमारास राजेंद्र नगर परिसरात पोहोचली. त्यावेळी तीन वर्षांच्या मेहक खातून शेखचा अपघात झाला. या बसखाली मेहक चिरडली. ही बस डागा ग्रुपद्वारे चालविण्यात येत होती, अशी माहिती बेस्टकडून देण्यात आली.
बसचालक प्रकाश दिगंबर कांबळे (४८) हा अपघातग्रस्त बस चालवत होता. या बसमध्ये वाहक नव्हता. बेस्टकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुलगी अचानक रस्त्यावर आली. त्यावेळी चालकाने बस थांबवण्याचा प्रयत्न केला. पण ती बसच्या चालाखाली आली. त्यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. स्थानिक रहिवाशांनी तातडीने तिला कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात नेले. पण तेथील डॉक्टरांनी तिची तपासणी करून तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
पोलिसांकडून अपमृत्यूची नोंद
मुलीच्या मृत्युनंतर पोलिसांनी तातडीने याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करून करून चौकशी सुरू केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुलगी बसच्या समोरील डाव्या बाजूच्या चाकाखाली आली. त्यामुळे तिला डोक्याला गंभीर स्वरूपाची जखम झाली. घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला होता. या अपघाताची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. याप्रकरणी सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाची तपासणी करण्यात येत आहे. तसेच प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले जात आहेत.
१२ गंभीर अपघात
गेल्या काही दिवसांंपासून बेस्ट उपक्रमामधील कंत्राटी बसचे अपघात वाढले आहेत. गेल्यावर्षी ९ डिसेंबर रोजी कुर्ला बेस्ट बस अपघातात ९ नागरिकांचा मृत्यू झाला होता. कुर्ला पश्चिम येथील महापालिकेच्या एल विभाग कार्यालयासमोर रात्री १० च्या सुमारास भीषण अपघात झाला होता. भरधाव वेगात धावणाऱ्या बेस्टच्या बसने अनेक पादचारी व वाहनांना धडक दिली. या अपघातामध्ये ४९ जण जखमी झाले होते. त्यापैकी सात जणांचा मृत्यू झाला होता. जखमींपैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्यावर्षी बेस्टबसचे सुमारे १२ गंभीर अपघात झाले असून त्यापैकी बहुसंख्य अपघात कंत्राटी बस चालकांकडून झाले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनीही खासगीकरणाला विरोध केला होता.