जुहूमधील तीन वर्षांच्या एका शाळकरी मुलीवर स्कूलबसच्या क्लीनरनेच या आठवडय़ाच्या सुरूवातीस बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी रमेश राजपूत यास अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर केले असता, १ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
  जुहू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलेपार्ले येथे राहणारी ही तीन वर्षांची मुलगी जुहू येथील प्रतिष्ठित आणि उच्चभ्रूंच्या ‘प्ले ग्रुप’ मध्ये शिकते. ही मुलगी शाळेच्या बसमधून शाळेत जात असे. तीन दिवसांपूर्वी घरी परत जात असताना सर्व मुलांना घरी सोडल्यावर बसमध्ये ती एकटीच मागे राहिली होती. त्यावेळी क्लीनर रमेश  राजपूत (३५) याने तिच्यावर बलात्कार केला.
गुरुवारी तिला त्रास होऊ लागल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यावेळी आपल्याला क्लीनरने त्रास दिल्याचे तिने घरच्यांना सांगितले. पालकांनी याबाबत जुहू पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी राजपूतला अटक केली. त्याच्यावर विनयभंग, बलात्कार, अनैसर्गिक बलात्कार आदी गुन्ह्य़ांबरोबरच ‘प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड फ्रॉम सेक्शुअल अ‍ॅक्ट २०१२’ या कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. शुक्रवारी त्याला अंधेरी येथील न्यायालयात हजर केले असता १ फेब्रुवारीपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याचे पोलीस उपायुक्त प्रताप दिघावकर यांनी सांगितले. त्याने इतर मुलींशी असा प्रकार केला आहे का, तसेच या प्रकरणामध्ये बसचालकाचाही सहभाग आहे का त्याचाही तपास पोलीस करत आहेत.
दिल्लीपाठोपाठ मुंबई.. दिल्लीतील बलात्काराच्या घटनेला महिनाही होत नाही तोच मुंबई आणि उपनगरे परिसरातील महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांनी हे शहर मुलींसाठी सुरक्षित आहे का, असा प्रश्न उभा राहिला आहे. डोंबिवलीत वडील आणि भावाकडून झालेला बलात्कार असो, उपनगरांतील विविध ठिकाणी वारंवार होणाऱ्या विनयभंगाच्या घटना असोत किंवा थेट तीन वर्षीय मुलीवर झालेला बलात्कार असो, यामुळे दिल्लीपाठोपाठ मुंबई मुलींसाठी असुरक्षित असल्याचेच स्पष्ट होत आहे.

Story img Loader