भ्रमंती म्हटली की, गड-किल्ले, शिखरे, सुकळे, कडे, गुहा, लेणी, मंदिरे, निसर्ग, जंगले असे सर्वसाधारण चित्र नजरेसमोर तरळत राहते. मात्र या प्रतिमेला छेद देत तीन तरुणांनी रेल्वेने संपूर्ण भारत भ्रमंती केली आहे. विशेष म्हणजे भारताच्या चारही दिशांपर्यंत जाण्यासाठी १७ दिवसांचा आणि २६५ तासांचा प्रवास त्यांनी रेल्वेच्या सामान्य डब्यातून केला. यासाठी त्यांनी दहा वेगवेगळ्या रेल्वेगाडय़ांनी प्रवास करण्याचा मार्ग स्वीकारला. प्रवासादरम्यान आलेले अनुभव, आठवणी आणि शहाणपण मनात साठवून ते गेल्याच आठवडय़ात मुंबईत परतले.
भारतीय रेल्वे मार्गापकी सर्वात प्रदीर्घ रेल्वे मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिब्रुगड आणि कन्याकुमारीदरम्यानचा रेल्वे प्रवास करण्याची समर्थ महाजन या तरुणाची कल्पना त्याने त्याच्या मित्रांकडे बोलून दाखवली. या कल्पनेचे रूपांतर काही क्षणातच भारत भ्रमंतीत झाले. त्यानुसार एका माध्यम निर्मिती समूहात काम करणाऱ्या तीन तरुण मित्रांचा रेल्वे गाडीने भारतभ्रमंतीचा प्रवास सुरू केला.
पश्चिम रेल्वे मार्गावरील अगदी शेवटच्या टोकापासून म्हणजेच ओखा रेल्वे स्थानकातून समर्थ महाजन, ओमकर दिवेकर आणि रजत भार्गव या तीन तरुणांनी रेल्वेच्या सामान्य डब्याचे तिकीट घेऊन प्रवास सुरू केला. कोणताही अनुभव आणि उद्देश गाठीशी नसताना केवळ आपल्या देशातील विविध प्रातांतील सर्वसामान्य माणसाला भेटायचे. त्यांच्याशी बोलायचे. हा संकल्प मनात घेऊन त्यांनी प्रवास सुरू केला. त्यातही हा प्रवास रेल्वेच्या वातानुकूलित डब्यातून नव्हे तर सर्वसामान्य डब्यातून करायचा असा निर्णय घेण्यात आला.
ओखा रेल्वे स्थानकातून सुरू झालेला प्रवास दिल्लीपर्यंत करण्यात आला. त्यानंतर जम्मूला पोहोचलो. तिथून कटराला, त्यानंतर पुन्हा जम्मूहून दिल्लीला, त्यानंतर ब्रह्मपुत्रा एक्स्प्रेसने अडीच दिवसांचा प्रवास करून दिब्रुगड त्यानंतर ८५ तासांचा प्रवास करून कन्याकुमारीला पोहोचलो. तिथून त्रिवेंद्रमला मुक्काम करून नेत्रावती एक्स्प्रेसने मुंबईला परतलो म्हणजेच भारताच्या चारही टोकाचा प्रवास आम्ही रेल्वेच्या सामान्य डब्यातून पूर्ण केला, असे ओमकार दिवेकरने सांगितले. तर रेल्वेच्या सामान्य डब्यातून प्रवास करताना जीवनाच्या अस्सल गाभ्याला स्पर्श करणारी अनेक माणसे भेटली. सामान्य जीवनातील न संपणारे दु:ख असूनही माणासांचा ‘प्रवास’ सतत सुरू राहिलेला दिसला. सांस्कतिक समुद्धी, प्रत्येक टप्प्यावर बदलत जाणारे सामाजिक जीवन कधी सुखद तर कधी अस्वस्थ करणारे आहे. अशा सगळ्या आठवणी मनात घेऊन आम्ही मुंबईत परतलो, असे हे तिघेही सांगतात. तर दोन वेळा तिकिटांचे आरक्षण न झाल्याने निर्माण झालेल्या गोंधळावर त्याचे हसू आवरत नाही. पुणे, पंजाब आणि राजस्थान अशा तिन्ही वेगवेगळ्या ठिकाणाहून मुंबईत आलेले हे मित्र एका माध्यम निर्मिती समूहात काम करत आहेत. ओमकार हा सिनेमॅटोग्राफर असून समर्थ लेखक-दिग्दर्शन, तर रजत हा पटकथा लेखक आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा