मुंबईः कॅनडा येथे नोकरीचे आमिष दाखवून तीन बेरोजगार तरुणांची फसवणुक केल्याप्रकरणी एका खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या संचालकाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. सचिन जाधव असे आरोपी संचालकाचे नाव आहे. तक्रारदार सुशांत सुरेश किस्मतराव हा तरुण शहापूर येथील रहिवासी आहे. शहापूर येथे त्याचा मामा मोटार चालकांना प्रशिक्षण देतो. त्याला विदेशात नोकरी करण्याची इच्छा होती. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यांत एका इंग्रजी वर्तमानपत्रात त्याने कॅनडा येथे नोकरीविषयी एक जाहिरात वाचली होती. या जाहिरातीवर दिलेल्या क्रमांकावर त्याने दूरध्वनी केला असता त्रिशा जैन या महिलेने त्याला कार्यालयात नोकरीसंदर्भात विचारपूस करण्यासाठी बोलाविले होते. त्यामुळे तो अंधेरीतील एमआयडीसी परिसरात असलेल्या एका ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात गेला होता. त्याचा मालक सचिन जाधव असून तो तिथे संचालक म्हणून काम करतो. तेथेच त्याला कॅनडामध्ये नोकरीचे आमिष दाखवून त्याच्याकडून त्रिशाने प्रक्रिया शुल्क म्हणून एक लाख साठ हजार रुपये घेतले होते. सुशांतसह तेथे राजेंद्र सिंह आणि हिरु वाधवा नावाचे इतर दोन तरुण आले होते. त्यांच्याकडून अनुक्रमे दिड लाख आणि दोन लाख रुपये शुल्क घेण्यात आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मराठा आरक्षणासंदर्भातील फेरविचार याचिका रखडली; तांत्रिक बाबींमुळे संभ्रम

अभियंता पदासाठी त्यांची निवड करण्यात आली होती. ही रक्कम घेतल्यानंतर त्यांना दूतावासात मुलाखतीसाठी बोलविण्यात येईल आणि नंतर कॅनडा येथे पाठविले जाईल असे सांगितले. मात्र त्यांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले नाही. वारंवार विचारणा करुनही त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे त्याने कॅनडातील संबंधित कंपनीची माहिती संकेतस्थळावर काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ही कंपनी बनावट असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्याने त्याच्या पैशांची मागणी केली. मात्र सचिन जाधवने त्याला पैसे परत केले नाहीत. अशा प्रकारे सचिनने त्याच्यासह अन्य दोन तरुणांना कॅनडामध्ये नोकरी मिळवून देतो असे सांगून त्यांच्याकडून सव्वापाच लाख रुपये घेतले आणि त्यांची फसवणुक केली होती. त्यामुळे सुशांतने सचिनसह इतर दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी या तिघांविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला होता. या तिघांचा शोध सुरु असताना सचिन कदम याला पोलिसांनी अटक केली. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three youths cheated luring them with jobs in canada mumbai print news ysh