हरिश्चंद्रगड येथे ट्रेकिंगदरम्यान अडकून पडलेल्या कल्याणच्या २० ट्रेकर्सची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. हरिश्चंद्रगड येथे ट्रेकिंगसाठी गेलेले २० जण अडकून पडले होते. सोमवारी सकाळी ही बचाव मोहिम पुन्हा सुरु करण्यात आली. काल संध्याकाळी अंधार पडल्यानंतर त्यांना मार्ग सापडत नव्हता. दरम्यान त्यांच्या मदतीसाठी इतर ट्रेकर्स आणि प्रशासनाने प्रयत्न सुरु केले होते.
हरिश्चंद्र गडावरील कोकणकड्याचा ५०० मीटर्सचा सुळका उतरायला सकाळी ट्रेकर्सनी सुरुवात केली होती. ३ तास पायी चालत जाऊन त्यांना आपल्या बेस कँप येथे पोहोचता येणार आहे. याला किमान ६ ते ७ तासांचा कालावधी लागू शकतो. दरम्यान, या ट्रेकर्सच्या मदतीसाठी इतर व्यावसायिक ट्रेकर्स रवाना झाले होते.
कल्याणचे डॉ. हितेश अडवाणी हे २० जणांसोबत हरिश्चंद्रगड येथे ट्रेकिंगसाठी गेले होते. त्यांच्यासोबत ५ महिला व १७ पुरुष आहेत. हे सर्व कोकणकडापासून खाली १००० फूट अंतरावर अडकले होते. अंधार असल्याने त्यांना मार्ग सापडत नव्हता. जिल्हाधिकाऱ्यांनी ठाणे ग्रामीण पोलीस तसेच जुन्नर पोलीसांना या घटनेविषयी कळविले.
रविवारच्या या घटनेत अंधार पडल्याने त्यांना रात्र तिथेच काढावी लागली. जिल्हा प्रशासन या ट्रेकर्सचे मनोधैर्य वाढविण्यासाठी सातत्याने त्यांच्या तसेच नगर जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात होते. याशिवाय ठाण्याहूनही काही ट्रेकर्सची मदत घेतली. मुरबाड तहसीलदार आणि त्यांचे कर्मचारी देखील बचावाच्या दृष्टीने प्रयत्न करीत होते.