मुंबई शहर व उपनगरातील ‘टाटा पॉवर कंपनी’च्या वीजग्राहकांसाठी राज्य वीज नियामक आयोगाने दरवाढ मंजूर करणारा आदेश दिला आहे. त्यामुळे १ जुलैपासून ‘टाटा’च्या सुमारे साडेतीन लाख ग्राहकांचे वीजदर सरासरी १२.१५ टक्क्यांपेक्षा जास्तने वाढणार आहेत.
बहुवार्षिक वीजदर प्रणालीनुसार वीज आयोगाने शुक्रवारी रात्री ‘टाटा’च्या दरवाढीला परवानगी देणारा आदेश काढला. त्यानुसार २०१३-१४ मध्ये सरासरी १२.१५ टक्क्यांनी, २०१४-१५ मध्ये १२.३४ टक्क्यांची तर २०१५-१६ मध्ये ११.७८ टक्क्यांनी वीजदरात वाढ होईल. २०१४-१५ मध्ये ५९३ कोटी ८७ लाख, तर २०१५-१६ मध्ये ६९० कोटी ९८ लाख रुपये दरवाढीपोटी वसूल करण्यास वीज आयोगाने परवानगी दिली आहे. अर्थात वीजवापर आणि ग्राहकगटानुसार मुंबईकरांना यापेक्षा अधिक दरवाढ सोसावी लागण्याची शक्यता आहे.
वीजबिलातून सुटका
दरमहा १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांच्या वीजवापराची नोंद करण्यासाठी मीटरवाचन आता दर महिन्याला न होता दोन महिन्यांतून एकदा करण्यात येणार आहे. त्यामुळे आता या गटातील ३० हजार ग्राहकांची दरमहा वीजदेयक भरण्याच्या कटकटीतून सुटका होईल.