गर्भवती महिलांमध्ये थायरॉईड होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आले असून अनेकदा मातेकडून नवजात अर्भकाला थायरॉईडची लागण होण्याची शक्यता असते. नवजात अर्भकातील थायरॉईडचे निदान वेळेत न झाल्यास त्याचा परिणाम बाळाच्या मेंदूवर होऊ शकतो. पर्यायाने नवजात अर्भकाच्या बुद्धीची वाढ खुंटणे, ते गतिमंद होण्याची शक्यता अधिक असते. भावी पिढी सुदृढ व सक्षम असावी यासाठी आता ‘मिशन थायरॉईड’अंतर्गत राज्यातील सर्व नवजात अर्भकांची थायरॉईड तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी आवश्यक असणारे किट रुग्णालयामध्ये उपलब्ध करण्यात आले आहेत.
हेही वाचा >>> ‘स्टोरी टेल’वर ‘एप्रिल पुल’; ‘पुल’च्या निवडक कथा ऑडिओ बुक स्वरुपात ऐकण्याची संधी
गर्भवती महिलांमध्ये थायरॉईड होण्याची शक्यता अधिक असते. अनेकदा आईमुळे नवजात बालकांमध्ये थायरॉईडचे संक्रमण होण्याची शक्यता असते. नवजात अर्भकांमधील थायरॉईडचे निदान वेळेत न झाल्यास बालकाचे पोट सुटणे, त्याची त्वचा खरखरीत होणे, बुद्धीची वाढ खुंटणे, बालक गतिमंद होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे थायरॉईडचे निदान चार दिवसांमध्ये होणे आवश्यक असते. त्यानंतर निदान झाल्यास बाळावर त्याचे कमी – अधिक प्रमाणात दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. हे दुष्परिणाम टळण्यासाठी जन्माला आलेल्या बाळाची चार दिवसांमध्ये थायरॉईड चाचणी करण्यात येणार आहे. राज्य सरकारने ‘मिशन थायरॉईड’अंतर्गत सर्व वैद्यकीय महाविद्यालयात सुरू केलेल्या ‘थायरॉईड बाह्यरुग्ण विभागा’मार्फत ही तपासणी करण्यात येणार आहे. ही तपासणी करण्यासाठी आवश्यक किट सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी माहिती जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली.
हेही वाचा >>> मुंबईचे डबेवाले ३ एप्रिलपासून सहा दिवसांच्या सुट्टीवर! ‘हे’ आहे कारण
महिलांची थायरॉईडची तपासणी वेळेवर व्हावी आणि त्यांच्यावर योग्य उपचार व्हावेत यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून राज्य सरकारने ‘मिशन थायरॉईड’ हाती घेतले आहे. ‘मिशन थायरॉईड’अंतर्गत राज्यातील महिलांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात येणार आहे. राज्यात २५ लाख महिला थायरॉईडने ग्रस्त असून अनेक महिलांमध्ये जनजागृती नसल्याने तपासणी होत नाही. त्यामुळे जे. जे. रुग्णालयासह राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दर गुरुवारी पूर्ण वेळ थायरॉईड बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. यामध्ये वैद्यकीय, शल्य चिकित्सक आणि नाक, कान, घास विभाग एकत्रित काम करणार आहेत. यात अल्ट्रा सोनोग्राफी थायरॉईड ग्रंथीच्या तपासण्या करण्यात येणार आहेत. या बाह्यरुग्ण विभागामुळे रुग्णांची नोंद ठेवून औषधोपचार करणे सोपे होईल, असे मिशन थायरॉईड उपक्रमाचे प्रमुख आणि जे. जे. रूग्णालयातील कान, नाक, घसा विभागाचे प्रमुख डॉ. श्रीनिवास चव्हाण यांनी सांगितले.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणार
महिलांमध्ये थायरॉईड होण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे महिलांना त्याबाबत माहिती असावी यासाठी शालेय स्तरावर जनजागृती करण्यावर भर देण्यात येणार आहे. शाळेतील इयत्ता नववी आणि दहावीतील विद्यार्थिनींना याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. थायरॉईडची लक्षणे, होणारा त्रास याची माहिती त्यांना देण्यात येणार आहे. तसेच थायरॉईडचा त्रास होत असल्यास त्यांच्यावर जवळील रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येतील.
थायरॉईड बाबत योग्य माहिती नसल्यामुळे महिलांना त्रास होतो. त्यामुळे थायरॉईडचे अचूक व योग्य निदान व्हावे आणि वेळेत उपचार मिळावेत यासाठी जे. जे. रुग्णालयामध्ये थायरॉईड बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. येथे उपचार, तपासण्या आणि औषधे उपलब्ध करण्यात येणार आहेत.
– डॉ. पल्लवी सापळे, अधिष्ठात्या, जे जे रुग्णालय समूह.