कोणतेही श्वान एखाद्या व्यक्तीमध्ये प्रेम शोधण्याचा प्रयत्न करतात. श्वानप्रेमी श्वानांच्या स्वभावाशी जुळवून घेत आपला एकटेपणाही श्वानांच्या सान्निध्यात घालवतात. एकमेकांना प्रेमाची देवाणघेवाण करताना श्वान आणि व्यक्ती यांमध्ये नाते घट्ट होते. श्वानांची जबाबदारी असलेली व्यक्ती या श्वानांचे केवळ मालक न राहता पालक बनून त्यांची काळजी घेते. निरपेक्ष प्रेम देणारे हे श्वान कदाचित म्हणूनच जागतिक नेत्यांच्या चर्चेतही औत्सुक्याचा विषय ठरत असतात. काही श्वान शारीरिकदृष्टय़ा दिसायला ताकदवान नसले तरी आपल्या मूळच्या स्वभाव, सवयींमुळे श्वानप्रेमींचे विशेष लक्ष वेधतात. तिबेटियन स्पॅनिअल हे अशाच प्रकारात मोडणारे श्वान आपले खास वैशिष्टय़ जपतात. आकाराने अतिशय लहान असलेले, गोंडस व्यक्तिमत्त्वाचे तिबेटियन स्पॅनिअल या श्वानांची उत्पत्ती तिबेटच्या डोंगरांमध्ये झाली. या श्वानांचा सुमारे पंचवीस हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आढळतो. तिबेटमध्ये बौद्ध भिक्षुं तिबेटियन स्पॅनिअल हे श्वान पाळत होते. बौद्ध धर्मीयांचे वास्तव्य असणाऱ्या देशामध्ये तिबेटियन स्पॅनिअल हे श्वान आढळतात. पूर्वी तिबेटचे डोंगर, निर्जनस्थळी तिबेटियन स्पॅनिअल सापडायचे. बौद्ध धर्मस्थळांच्या ठिकाणी या श्वानांचे वास्तव्य आढळते. बौद्ध देशांमध्ये, धर्मस्थळांमध्ये आजही तिबेटियन स्पॅनिअल श्वानांची देवाणघेवाण केली जाते. आकाराने लहान असले तरी एखाद्या वॉचडॉगप्रमाणे हे श्वान काम करतात. पिकिलिन, जॅपनिज चिन, शित्झू, लासा, तिबेटियन टेरिअर, पग अशा श्वानजातींचे एकत्रित हे तिबेटियन स्पॅनिअल बनले आहे. १९०८ मध्ये हे श्वान ‘युके’मध्ये गेल्यावर जगभरात या श्वानांचा प्रसार झाला. साधारण दहा ते पंधरा वर्षे या श्वानांचे आयुष्य असते. सहा ते सात किलो वजन आणि दहा ते अकरा इंचांपर्यंत या श्वानांची उंची वाढते. विशेष म्हणजे वेगवेगळ्या रंगांत हे श्वान असल्याने अतिशय रूपवान दिसतात. उत्तम वॉचडॉगप्रमाणे काम करत असल्याने घरात पाळण्यासाठीही हे श्वान उत्तम आहेत. या श्वानांच्या संपूर्ण शरीरावर दाट केस असतात. थंडीत केसांचे प्रमाण वाढते. याउलट उन्हाळ्यात या श्वानांच्या शरीरावरील केस गळतात. स्वभावाने शांत असल्याने कोणत्याही वयोगटातील व्यक्तीशी हे श्वान सहज जुळवून घेतात. या श्वानांची सतर्क आणि शांत वृत्ती अधिक भावते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉग शोजमध्ये सहभागी करून घेण्यासाठी या श्वानांना पूर्वीपासूनच सोशल करावे लागते. माणसांची सवय लहानपणापासूनच या श्वानांना असल्यास या श्वानांचे पालन करण्यास फार अडथळा जाणवत नाही. या श्वानांना विशेष प्रशिक्षण देणे गरजेचे नसते. एखाद्या टॉय ब्रीडप्रमाणे असले तरी घरात आलेल्या परक्या माणसाशी हे श्वान पटकन जुळवून घेत नाहीत. घरातील विरंगुळ्यासाठी तिबेटियन स्पॅनिअल उत्तम पर्याय आहेत, असे म्हणता येईल. भारतात फार मोठय़ा प्रमाणात तिबेटियन स्पॅनिअल आढळत नाहीत. पूर्वी काही भारतीयांनी हे श्वान भारतात आणले. शरीरावर संपूर्ण केसांचे आवरण असल्याने या श्वानांना उष्ण वातावरणात तग धरता येत नाही. या श्वानांची किंमत पंचवीस, तीस हजारांपेक्षा जास्त असल्याने श्वानपालक या श्वानांना थंड वातावरणात ठेवण्यालाच प्राधान्य देतात.

लिटल लायन

तिबेटियन स्पॅनिअल या श्वानांच्या चेहऱ्याचा आकार काही प्रमाणात सिंहाच्या चेहऱ्याशी साधम्र्य साधणारा असल्याने या श्वानांना जगभरात लिटल लायन असेही म्हटले जाते.