दंड भरण्यास नकार देणाऱ्या प्रवाशास बुधवारी सायंकाळी पश्चिम उपनगरातील नालासोपारा रेल्वे स्थानकावर तिकीट तपासनीसाने बेदम मारहाण केली. जखमी प्रवाशास नालासोपारा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिकीट तपासनीसाची चौकशी करण्यात येत आहे.
हसन अन्सारी हा प्रवासी बोरिवलीहून नालासोपारा येथे जात होता. तो विनातिकीट प्रवास करीत होता. नालासोपारा रेल्वे स्थानकावर तिकीट तपासनीस सुनील याने हसनला पकडले. हसनने दंड भरण्यास नकार दिल्यावर त्याला रेल्वे स्थानकप्रमुखाच्या कार्यालयात नेण्यात आले. तेथे दंड भरण्याऐवजी हसन आरडाओरड करू लागला. आरडाओरड ऐकून जमलेल्या गर्दीचा फायदा उठवत पळून जाण्याच्या प्रयत्नात हसन जखमी झाला, असे रेल्वे सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र आपल्याला तिकीट तपासनीसाने मारहाण केल्याचा आरोप हसनने केला आहे.
हसनच्या मित्रांच्या म्हणण्यानुसार, हसनने तिकीट तपासनीसाला दंडाची रक्कम दिल्यावर पावती देण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. दोघांमध्ये मारामारी झाली. रेल्वे स्थानकप्रमुखाच्या कार्यालयात आणखी काहीजणांनी हसनला मारहाण केली. त्यात त्याचे डोके फुटले. या प्रकरणी तिकीट तपासनीस सुनीलची चौकशी करण्यात येत असून हसनला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा