रात्रीच्या वेळी प्रवास करताना गाडीचा दिवस बदलतो या साध्या गोष्टीकडे प्रवाशांचे लक्ष जात नसल्याचा फायदा रेल्वेच्या तिकीट तपासनीस उठवत आहेत. प्रवाशांच्या या अज्ञानाचा फायदा घेत कोकण रेल्वेच्या तिकीट तपासनीसांचे आता ‘दिवस’ बदलले आहेत. अशा अज्ञानी प्रवाशांकडून दंड म्हणून हजारो रुपये वसूल करून त्यांना सतत दबावाखाली प्रवास करायला लावणारे तिकीट तपासनीस रेल्वेलाही फसवून आपले उखळ पांढरे करून घेत आहेत.
उन्हाळी सुटीनिमित्त सध्या मुंबई ते मडगाव, सावंतवाडी दरम्यान काही विशेष गाडय़ा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यापैकी काही गाडय़ा रात्रीच्या वेळी सोडण्यात येतात.
दादर-सावंतवाडी राज्यराणी एक्स्प्रेस या गाडीच्या वेळेचा फायदा तिकीट तपासनीसांना चांगलाच होत आहे. ही गाडी दादरहून रात्री ११.५५ वाजता सुटते. त्यामुळे ही गाडी ठाण्याला पोहोचेपर्यंत गाडीचा दिवस बदलतो. अनेक प्रवासी या गाडीचे तिकीट काढताना ही गोष्ट लक्षात घेत नाहीत आणि नेमके हेच तिकीट तपासनीसांच्या पथ्यावर पडते.
१७-१८ एप्रिलला ठाण्याहून या गाडीत बसलेल्या पवार कुटुंबाला याचा चांगलाच अनुभव आला. या कुटुंबाने १८ तारखेच्या गाडीचे तिकीट काढले होते. प्रत्यक्षात हे तिकीट १७ तारखेला सुटणाऱ्या राज्यराणी एक्स्प्रेसचे होते.
मात्र त्या कुटुंबाच्या हे ध्यानात आले नाही आणि त्यांनी १८ तारखेला सुटलेल्या म्हणजेच १९ तारखेला ठाण्यात पोहोचलेल्या गाडीमध्ये प्रवेश केला. गाडी रोह्याच्या पुढे आल्यावर तिकीट तपासनीसाने तिकीट तपासताना ही बाब त्या कुटुंबाच्या ध्यानात आणून दिली आणि दंड म्हणून साडेचार हजार रुपये भरण्यास सांगितले. इतकी मोठी रक्कम दंड म्हणून भरण्यास त्या कुटुंबाने असहायता दाखविल्यावर तडजोड करत अडीच हजार रुपये घेण्यास तो तयार झाला. मात्र त्याची पावती त्याने दिली नाही. त्याच डब्यात असे किमान १० ‘अज्ञानी’ प्रवासी होते. त्यांच्याकडूनही अशीच रक्कम घेण्यात आली. रत्नागिरी येथे सकाळी गाडी आल्यावर नव्या तिकीट तपासनीसाला रात्रीच्या तपासनीसाने सांकेतिक भाषेत काही सांगितल्यावर सर्वांना त्यांच्या मुक्कामापर्यंत कोणताही त्रास झाला नाही. दंडाची कोणतीही पावती देण्यात आली नसल्यामुळे रेल्वेकडे ही रक्कम जमा झालेली नाही.
किमान तीन ते चार तिकीट तपासनीसांमध्येच ही रक्कम वाटली गेल्याचे समजते. दररोज रात्री किमान काही हजार रुपये अशा प्रकारे तिकीट तपासनीसांना मिळत आहेत.

Story img Loader