मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील विनातिकीट प्रवाशांची संख्या वाढत असून पास आणि तिकीटधारक प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होत आहे. विनातिकीट प्रवाशांची धरपकड करण्यास वारंवार मोहिमा राबवल्या जात आहेत. तसेच, ‘फोर्ट्रेस चेक’ अर्थात प्रवाशाला चारही बाजूंनी घेराव घालून पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. आता वातानुकूलित लोकल, सामान्य लोकलमधील प्रवाशांच्या गर्दीत धक्काबुक्की सहन करीत तिकीट तपासणी सुरू आहे.
धावत्या लोकलमध्ये किंवा गर्दी असलेल्या लोकलमध्ये तिकीट तपासनीस येत नाही, असा प्रवाशांचा समज आहे. त्यामुळे अनेक प्रवासी तिकीट न काढताच प्रवास करतात. गर्दीचा फायदा घेऊन अनेक विनातिकीट प्रवासी लोकलमध्ये प्रवेश करतात. फलाटावरील तिकीट तपासनीसांची नजर चुकवून विनातिकीट प्रवासी रेल्वे स्थानकाबाहेर पडतात. यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाचा महसूल बुडत आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वे प्रशासनाने गर्दी असलेल्या लोकलमधील प्रवाशांकडील तिकिटांची तपासणी करण्याचे निर्देश तिकीट तपासनीसाना दिले आहेत. त्यामुळे सध्या तिकीट तपासनीस गर्दी असलेल्या लोकलमध्ये तिकीट तपासण्याचे काम करीत आहेत.
हेही वाचा – रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लाॅक
प्रवाशांनी अधिकृत तिकीट काढून प्रवास करावा, असे आवाहन पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. ठाणे – पनवेलदरम्यान धावत्या लोकलमध्ये एक महिला तिकीट तपासनीस आणि आरपीएफ जवानाद्वारे तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. नियमितपणे ही मोहीम सुरू राहणार आहे, असे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा – मुंबई : अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणारी महिला अटकेत
शुक्रवारी पश्चिम रेल्वेवरील खार, सांताक्रूझ आणि विलेपार्ले या स्थानकात २७९ तिकीट तपासनीसांचे पथक तैनात करण्यात आले होते. प्रवाशांना घेराव घालून त्याचे तिकीट तपासण्यात येत होते. यात २,१०३ विनातिकीट प्रवासी आढळून आले असून त्यांच्याकडून पाच लाख ४४ हजार ९९५ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.