मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षांचे ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थी व पालकांना अनेक अडचणी येतात. त्या दूर करण्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून ‘तिकीट सिस्टिम’ ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्या व अडचणी संकेतस्थळाद्वारे थेट राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाला कळविता येणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या शंका व समस्यांचे निरसन करण्यासाठी मोफत संपर्क क्रमांकाबरोबरच स्वतंत्र मदतवाहिनीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षांच्या ऑनलाईन अर्जाची नोंदणी प्रक्रिया संकेतस्थळाच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. मात्र सामाईक प्रवेश परीक्षांचे अर्ज भरताना विद्यार्थी व पालकांना येणाऱ्या अडचणींसाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये तिकीट सिस्टिम ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेनुसार विद्यार्थ्यांच्या लॉगिन आयडीमध्ये ‘तिकीट सिस्टिम’ हा पर्याय उपलब्ध असेल. विद्यार्थांना त्यावर क्लिक करून अर्ज नोंदणी करताना किंवा पुढील प्रवेश प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या समस्या व अडचणी थेट राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडे मांडता येणार आहेत. त्यावर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने ठराविक कालावधीत उत्तर देणे अपेक्षित असल्याने विद्यार्थ्यांच्या शंकांचे जलदगतीने निरसन होण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा – मुंबईच्या वेशीवर जड-अवजड वाहनांकडून २०२७ नंतरही पथकर वसुली?

हेही वाचा – स्वयंविनियामक संस्थेतील प्रतिनिधींची आता दोन वर्षांसाठीच नियुक्ती, दोन वर्षांनंतर प्रतिनिधी बदलावे लागणार

‘तिकीट सिस्टिम’ या सुविधेनुसार विद्यार्थ्यांना शंका व समस्या उपस्थित करण्यासाठी टोल फ्री क्रमांक आणि स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांक तसेच ई – मेल आयडीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून १८००२०९०१९१ हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्याबरोबरच ७९६९१३४४०१, ७९६९१३४४०२ हे दोन हेल्पलाईन क्रमांक सकाळी १० ते सायंकाळी ६ या कालावधीसाठी सुरू केले आहेत. या क्रमांकावर विद्यार्थी संपर्क साधून आपल्या समस्यांचे निरसन करू शकतात. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना cethelpdesk@maharashtracet.org या ई – मेल आयडीवर आपल्या शंका विचारता येतील. दरम्यान, राज्य सामाईक प्रवेश परीक्षांच्या नोंदणी प्रक्रियेसाठी येणाऱ्या अडचणी किंवा शंकासाठी cetcell@mahacet.org या प्रवेश परीक्षा कक्षाच्या ई-मेल आयडीवर कोणत्याही प्रकारचा मेल करू नये, अशा सूचनाही राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून विद्यार्थी व पालकांना दिल्या आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ticket facility to solve problems of students during cet registration mumbai print news ssb