मुंबई : मध्य रेल्वेवरील नाहूर स्थानकात एका तिकीट तपासनीसाला मारहाण झाल्याची घटना मंगळवारी घडली. विनातिकीट असलेला प्रवासी पळताना पादचारी पुलांच्या पायऱ्यांवरून पडला. या मुद्द्यावरून विनाकारण तिकीट तपासनीसाला मारहाण करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली. मारहाण करणाऱ्या प्रवाशाविरोधात मध्य रेल्वेने गुन्हा दाखल के ला आहे.
मुख्य तिकीट निरीक्षक सुभाष जोशी यांच्या देखरेखीखाली नाहूर स्थानकात तिकीट तपासणी मोहीम सुरू होती. या स्थानकातील एका पादचारी पुलावर तिकीट तपासनीस संदीप चितळे, अन्य दोन तिकीट तपासनीस आणि दोन रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारीही होते. ही तपासणी पाहताच एक प्रवासी पादचारी पुलावरून पळू लागला आणि पायऱ्यांवरून तोल जाऊन खाली पडला. हे पाहताच काही प्रवाशांनी तिकीट तपासनीस चितळे यांना घेराव घालून जाब विचारण्यास सुरुवात केली व शिवीगाळ करून मारहाण केली. तिकीट तपासनीसांनी नाहूर लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.