लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : पश्चिम रेल्वेवरील अंधेरी स्थानक सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांपैकी एक स्थानक आहे. या स्थानकातून विनातिकीट प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेने विनातिकीट प्रवाशांना पकडण्यासाठी मंगळवारी अंधेरी स्थानकात तिकीट तपासणी मोहीम राबविली. यासाठी ३६ तिकीट तपासनीस आणि १० आरपीएफ आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान असे ४६ जणांची फौज अंधेरी स्थानकात तैनात होती. फक्त आठ तासात ९९९ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करून २.६५ लाख रुपयांचा महसूल गोळा करण्यात पश्चिम रेल्वेला यश मिळाले आहे.
आणखी वाचा-भुजबळांसह मुलगा आणि पुतण्याविरूद्धची बेनामी संपत्तीची तक्रार उच्च न्यायालयाकडून रद्द
पश्चिम रेल्वेवरील विनातिकीट प्रवाशांचा सुळसुळाट वाढला आहे. त्यामुळे ३० सप्टेंबर २०२३ रोजी पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकात १९५ तिकीट तपासनीस तैनात करण्यात आले. यात तब्बल १,६४७ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करून ४ लाख २१ हजारांचा दंड वसूल केला. त्यानंतर ३ ऑक्टोबर २०२३ रोजी अंधेरी येथे १९९ तिकीट तपासनीसाद्वारे २,६९३ विनातिकीट प्रवशांना पकडले. त्यांच्याकडून ७,१४,०५५ रुपयांची दंडवसुली केली. तर, मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत ९९९ विनातिकीट प्रवाशांना पकडून, २,६५,१११ रुपये दंडवसुली करण्यात आली, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिली.