क्रिकेटपटू श्रीशांतसह इतर २६ जणांवर ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्या’न्वये (मोक्का) दिल्ली पोलिसांनी केलेली कारवाई अडचणीत येण्याची शक्यता मुंबई पोलीस दलातील सूत्रांनी वर्तवली आहे. दिल्ली पोलिसांनी सट्टेबाजीमध्ये टायगर मेमनचा संबंध असल्याचे म्हटले आहे. इतकेच नव्हे तर टायगर मेमनचे संभाषण ध्वनिमुद्रित केल्याचा दावाही केला आहे. परंतु दिल्ली पोलिसांनी ‘टायगर’चे संभाषण ध्वनिमुद्रित केले असेल. परंतु तो टायगर मेमन नव्हे तर ‘टायगर’ ऊर्फ प्रकाश चंदनानी असण्याची शक्यता मुंबई पोलिसांना वाटत आहे.
 विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की,  स्पॉट- फिक्सिंग प्रकरणाचे सूत्रधार दुबईत होते. त्यामध्ये टायगर मेमनचा सहभाग होता. मार्च महिन्यापासून गुप्तचर यंत्रणेने या टायगरचे संभाषण ध्वनिमुद्रित केले आहे. परंतु हा टायगर तो नसावा, असा मुंबई पोलिसांचा दावा आहे. टायगर मेमन हा पाकिस्तानमध्ये असून तो बाहेर पडलेलाच नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. मुंबई पोलिसांच्या म्हणण्यात तथ्य असल्यास दिल्ली पोलिसांचा ‘मोक्का’ अडचणीत येऊ शकतो, असेही या सूत्रांनी स्पष्ट केले. त्यांच्याकडे कुणा ‘टायगर’चे संभाषण असल्याच्या जोरावरच ते मोक्का टिकेल, असे म्हणत आहेत.
प्रकाश चंदनानी हा बडा सट्टेबाज असून त्याला पोलिसांनी यापूर्वी अटक केली होती. नितीन मनमोहन यांच्या ‘गली गली चोर है’ या चित्रपटाला चंदनानी याने अर्थपुरवठा केल्याची बाब तेव्हा उघड झाली होती. गुन्हे अन्वेषण विभागाने देवेन्द्र कोठारी, सोनू जालन याच्यासह डझनभर सट्टेबाजांना अटक केली होती. तेव्हा ही बाब समोर आल्याने पोलिसांनी चंदनानी याच्याविरुद्ध लूकआऊट नोटीसही जारी केली होती. मात्र आता आमच्याकडे चंदनानीच्या विरुद्ध कुठलेही पुरावे नाहीत. मात्र दुबईत वावरणारा टायगर चंदनानी म्हणजे प्रकाश चंदनानीच असावा, असा आमचा दाट संशय असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.

सट्टेबाजांकडे महागडे मोबाइल सिग्नल बुस्टर्स!
मुंबई : सट्टेबाजारात करोडो रुपयांची उलाढाल होते, हे गुपित राहिलेले नाही. परंतु सट्टेबाजांकडेही हवालाद्वारे करोडो रुपये येत असतात. सट्टेबाजारात महत्त्वाचे समजले जाणारे संभाषण तुटू नये, यासाठी सट्टेबाजांनी महागडे मोबाइल सिग्नल बुस्टर्स बसविल्याची बाबही चौकशीत उघड झाली आहे. इस्रायली कंपनीचे हे बुस्टर्स लाखो रुपये किमतीचे आहेत. मात्र त्यामुळे सट्टेबाजांचे मोबाइल संभाषण तासन्तास विनासायास सुरू राहते, असे सूत्रांनी सांगितले. मुंबईतील बडे सट्टेबाज सध्या भूमिगत झाले आहेत. पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी ते अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत. मात्र तरीही सट्टेबाजी सुरू असल्याचा दावा केला जात आहे. मुंबई पोलिसांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते आता सट्टेबाजी पूर्णपणे बंद आहे. संपूर्ण आयपीएल मोसमात जोरदार सट्टेबाजी होते, याकडे या अधिकाऱ्याने लक्ष वेधले आहे. प्रत्येक आयपीएल मोसमात फिक्सिंग झाले किंवा नाही, हे स्पष्ट झालेले नाही.

व्यासच्या चौकशीची दिल्ली पोलिसांना न्यायालयाची परवानगी
नवी दिल्ली : मुंबई पोलिसांनी अटक केलेला सट्टेबाज रमेश व्यासची चौकशी करण्याची परवानगी येथील महानगर दंडाधिकारी नमिता अगरवाल यांनी दिल्ली पोलिसांना दिली आहे. व्यासला दहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असून १८ जूनपर्यंत त्याची चौकशी दिल्ली पोलीस करू शकतात. व्यासला मुंबईच्या स्थानिक न्यायालयाने जामीन दिला असून त्यानंतर त्याला दिल्ली पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. व्यास याचे दिल्लीतील सट्टेबाज अश्विनी अगरवाल ऊर्फ टिंकू मंडी आणि पाकिस्तानमधील काही व्यक्तींशी संबंध असल्याचा संशय पोलिसांना आहे.