मुंबई : मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत धडकणारा मराठा मोर्चा आणि प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्ताची आखणी केली आहे. मुंबई पोलिसांच्या पुढील तीन दिवसांतील साप्ताहिक सुट्ट्यांसह सर्व प्रकारच्या सुट्ट्या (वैद्यकीय रजा वगळून) रद्द करण्यात आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रजासत्ताक दिनी मुंबईच्या सुरक्षेसाठी पोलीस दल सज्ज झाले आहे. त्यातच मराठा मोर्चासोबत मोठ्या प्रमाणात मराठा बांधव शहरात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन गर्दीच्या वेळी कोणतीही अनूचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी विशेष बंदोबस्ताची आखणी केली आहे. मराठा मोर्चा आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून विशेष खबरदारी घेत मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती आणि कायदा व सुव्यस्थेचे सहआयुक्त सत्यनारायण चाैधरी यांच्या देखरेखीखाली सर्व परिमंडळ आणि विविध विभागांचे अप्पर पोलीस आयुक्त, पोलीस उपआयुक्त, सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचा फौजफाटा शहरात तैनात असणार आहे. सुरक्षेच्या उद्देशाने २६ जानेवारी ते २८ जानेवारीपर्यंत मुंबई पोलिसांच्या साप्ताहिक सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय वैद्यकीय सुट्ट्या वगळता इतर सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा – म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीसाठी मुख्यमंत्र्यांना वेळ मिळेना

हेही वाचा – मुंबई विद्यापीठातर्फे ११० दिवसांनंतर विधी शाखेचा निकाल जाहीर; विधी शाखा तृतीय सत्र परीक्षेत ५७.७८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

गर्दीच्या, महत्वाच्या आणि अतिसंवेदनशील ठिकाणी बॉम्ब शोधक व नाशक पथके, श्‍वान पथकांच्या माध्यमातून तपासणी करण्यात येत आहे. सोबतच महत्त्वाच्या आणि अतिसंवेदनशील ठिकाणी एसआरपीएफ प्लाटून, शिघ्रकृती दलाची पथके तैनात ठेवण्यात आली आहेत. शहरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या माध्यमातून मुंबई पोलीस आयुक्तालयातील मुख्य नियंत्रण कक्षातून शहरातील बारीक-सारीक हलाचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. पोलिसांनी शहरातील पाचही प्रवेशद्वारांसह महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करुन संशयित वाहाने, वस्तू आणि व्यक्तींची कसून तपासणी सुरू केली असून हॉटेल्स, लॉजचीही तपासणी सुरू केली आहे. शहरात गर्दीच्या ठिकाणी साध्यावेशातील पोलीस तैनात ठेवण्यात आले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tight security in mumbai in wake of maratha agitation and republic day mumbai police holidays cancelled mumbai print news ssb
Show comments