मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुरुवारच्या मुंबई दौऱ्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी केली आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील सभेला विक्रमी गर्दी जमविण्यात येणार असून त्याद्वारे मुंबई महापालिका निवडणुकीचे रणिशग फुंकण्यात येणार आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मुंबई महापालिकेच्या सात सांडपाणी प्रकल्पांचे, तीन रुग्णालयांचे, ४०० किमी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांचे आणि रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासाचे भूमीपूजन करण्यात येणार आहे. तर मेट्रो २ अ, मेट्रो ७ आणि २० आपला दवाखान्यांचे लोकार्पण करण्यात येईल. वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) मैदानात डिजीटल पध्दतीने भूमीपूजन आणि लोकार्पण होईल. त्यानंतर पंतप्रधानांची सभाही होणार आहे. पंतप्रधान मेट्रो मार्गाने काही अंतर प्रवासही करणार आहेत. पंतप्रधानांच्या कार्यक्रमांसाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि मुंबई महापालिका यंत्रणेने पूर्ण तयारी केली आहे. मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोस येथून परतताच वांद्रे-कुर्ला संकुलात तयारीची पाहणी केली. तर फडणवीस यांनीही सकाळी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर कार्यक्रमस्थळी जाऊन तयारीचा आढावा घेत सूचना दिल्या.

आणखी वाचा – पंतप्रधान मोदींच्या शासकीय समारंभांचा राजकीय वापर? विरोधकांचा आक्षेप

सुमारे २५ वर्षे शिवसेनेच्या ताब्यात असलेली मुंबई महापालिका जिंकण्याचे भाजपचा निर्धार आहे. मोदी यांच्या सभेच्या माध्यमातून भाजप आणि शिंदे गटाच्या प्रचाराचा नारळ फोडला जाईल. यातून महापालिका निवडणुकीसाठी वातावरणनिर्मिती केली जाणार आहे. हा शासकीय समारंभ असला तरी भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीकडून राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप काँग्रेस, शिवसेना व अन्य विरोधकांनी केला आहे. युतीचे नेते गेल्या काही दिवसांपासून बीकेसीत विक्रमी गर्दी जमविण्याचे नियोजन करीत आहेत. भाजप आमदार-खासदार, जिल्हाप्रमुख, शिंदे गटातील विभागप्रमुख यांना सूचना देण्यात आल्या असून ठाण्यातूनही अनेक कार्यकर्ते येणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या सभेसाठी उस्फूर्तपणे लोकांची गर्दी होणार आहे, त्यांची लोकप्रियताच एवढी आहे, असे ज्येष्ठ भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या निमित्ताने भाजप व शिंदे गटाकडून फलकबाजी करण्यात आली आहे. पंतप्रधानांचे ढोलताशांच्या गजरात जंगी स्वागत केले जाणार आहे. राज्यात युतीचे सरकार स्थापन झाल्यावर मोदी प्रथमच मुंबई भेटीवर येत असल्याने युतीचे नेते एकदिलाने काम करीत असल्याचे चित्र आहे.

आणखी वाचा – मुंबई : पंतप्रधानांच्या दौरा काळात ड्रोन, छोट्या विमानांच्या उड्डाणास बंदी

वाहतूक कोंडीची शक्यता

पंतप्रधान मोदी यांच्या मुंबई दौऱ्यानिमित्त वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. कर्नाटक दौऱ्यावरून मोदी यांचे मुंबईत सायंकाळी पाचच्या सुमारास आगमन होईल. विमानतळावरून पंतप्रधान थेट वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानात जातील. साडेसहाच्या सुमारास मोदी मैदानातून विमानातळाकडे जातान मेट्रो रेल्वेचे लोकार्पण करणार आहेत. यामुळे सायंकाळी गर्दीच्या वेळी प्रचंड वाहतूक कोंडी होण्याची चिन्हे आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tight security in mumbai on the occasion of prime minister narendra modi visit amy