मुंबई : गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी मुंबईत पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुटय़ा रद्द करण्यात आल्या असून लालबाग व परळ परिसरात विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहेत. गर्दीच्या ठिकाणी ड्रोनचा वापर करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गणपती आगमन आणि विसर्जन काळात वाहतूक नियमनासाठी मुंबई वाहतूक पोलिसांसह सुमारे १० हजार पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. या ठिकाणी गर्दीच्या फायदा घेऊन समाजकंटकांनी घातपात घडवू नये, याकरिता मुंबई पोलिसांनी ३० हजारांहून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे, वरिष्ठ अधिकारी शहरात स्वत: यावर लक्ष ठेवणार असून अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे. यात शीघ्र कृती दल, फोर्स वन, बॉम्बशोधक व नाशक पथक, श्वान पथक, सशस्त्र दल, राज्य राखीव दलाचा समावेश आहे.

लालबागमध्ये विशेष लक्ष

लालबाग विभागात सुरक्षेच्या दृष्टीने एक विशेष कंमाड कंट्रोल सेंटर उभारणार आहेत. तसेच लालबागच्या राज्याच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी एक अतिरिक्त सहपोलीस आयुक्त, १२ पोलीस उपायुक्त, २०० पोलीस निरीक्षक, ८०० कर्मचारी, १ एसआरपीएफ, २ सीसीटीव्ही व्हॅन, कॉम्बिंग ऑपरेशन पथक, प्रत्येक प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर, हँड डिटेक्टरसह १,२०० जणांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

  बंदोबस्त..

  • महत्त्वाच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलीस तैनात
  • शहरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेवले जाणार आहे. गणेश मंडळांनाही मंडप परिसरात सीसीटीव्ही लावण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
  • स्थानिक मंडळांना पोलीस दिवसाकाठी तीन ते चार वेळा भेट देऊन परिस्थितीची पाहणी करणार आहेत.
  • गर्दीच्या ठिकाणी अल्पवयीन मुले व महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथकाला विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.
  • पोलिसांना अनेक स्वयंसेवी संस्थांकडूनही मदत मिळणार आहे. त्यात प्रशिक्षणार्थी पोलीस, गृहरक्षक जवान, नागरी संरक्षण दलाचे कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापनाचे स्वयंसेवक, नागरी सरंक्षण दलाचे जवान, एनएसएसचे विद्यार्थी, स्काऊट गाइडचे विद्यार्थी असणार आहेत.