देशातील श्रीमंत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिरुपती बालाजी मंदिराला नवी मुंबईत दहा एकर जमीन हवी आहे, तशी मागणी देवस्थान प्रशासनाने सिडकोकडे केली आहे. सिडको प्रशासन त्या दृष्टीने जमिनीचा शोध घेत असून यापूर्वी सिडकोने सत्य साईबाबा देवस्थानसाठी नाममात्र भाडेतत्त्वावर खारघर येथे ८० एकर जमीन दिलेली आहे.
आंध्र प्रदेशातील तिरुमल्ला तिरुपती देवस्थान विश्वस्त समितीच्या वतीने संचालित करण्यात येणारे तिरुपती बालाजी मंदिर जगप्रसिद्ध आहे. वर्षांला ६५० कोटी रुपये रोख आाणि सोने या मंदिरात जमा होत असल्याची माहिती उपलब्ध आहे. या देवस्थानच्या वतीने तीन हजार किलो सोने व एक हजार कोटी रुपयांच्या ठेवी विविध वित्त संस्थांमध्ये ठेवण्यात आली आहेत. या मंदिराला दोन हजार वर्षांचा इतिहास असून कधी काळी या मंदिराची देखभाल मराठा सेनापती राघोजी भोसले यांनी केल्याची नोंद आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि या देवस्थानचे एक नाते आजही आंध्र प्रदेशात सांगितले जाते. त्यामुळे या देवस्थान प्रशासनाला राज्यात एक प्रतिबालाजी मंदिर उभारण्याची इच्छा आहे. देशात अनेक राज्यात प्रतिबालाजी मंदिरे बांधण्यात आली आहेत पण त्यांना तिरुमल्ला तिरुपती देवस्थान विश्वस्त समितीचे आर्थिक अथवा अधिकृत मंजुरी मानली जात नाही. देवस्थानच्या वतीने पहिल्यांदाच अशा प्रकारे प्रतिबालाजी मंदिर उभारण्याचा मनोदय व्यक्त केला जात असून मुंबईत जमीन शिल्लक नसल्याने सिडकोकडे या जमिनीसाठी आग्रह धरण्यात आला आहे. त्यासाठी देवस्थानचे थेट पत्र काही दिवसांपूर्वी सिडकोकडे आले असून त्यानुसार सिडकोचा नियोजन विभाग या जमिनीचा शोध घेत आहे.
 प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आसपास ही जमीन मागितली गेली असून सिडकोने खारघर नोडमध्ये जमिनी पाहण्यास सुरुवात केली आहे. हे मंदिर नवी मुंबईत बांधले गेल्यास त्या निमित्ताने या परिसरात रुग्णालय, शाळा, कॉलेज यांची उभारणी होणे शक्य असल्याचे मत एका उच्च अधिकाऱ्याने व्यक्त केले. यापूर्वी सिडकोने अनेक धार्मिक स्थळांना जमिनी दिल्या असून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आग्रहास्तव शासनाच्या मान्यतेने सत्य साईबाबा ट्रस्टला ८० एकर जमीन देण्यात आल्याचे समजते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा