आसनगाव आणि टिटवाळा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान गेले सलग तीन दिवस सिग्नल यंत्रणेत बिघाड होत असल्याने या मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत होत आहे. लांब पल्ल्याच्या गाडय़ांना या विस्कळीतपणाचा फटका बसत आहे.
शुक्रवारी कसाराकडे जाणारी वाहतूक संध्याकाळी साडेसहा वाजता दोन तास सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे विस्कळीत झाली होती. शनिवारी खडवली रेल्वे स्थानकातील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने दोन्ही मार्गावरील वाहतूक एक तास विस्कळीत झाली. रविवारीही तोच प्रकार आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ घडला. त्यामुळे कसाराकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात येत नाही.
तात्पुरती दुरुस्ती केल्यानंतर बिघाडाचा प्रकार पुन्हा होत आहे. दररोज संध्याकाळी हा प्रकार घडत असल्याने चाकरमान्यांचे हाल होत आहेत. लोकल वाहतुकीवर आसनगाव, वासिंद, आटगाव येथे एसटीची बस सेवा निगडित असते. लोकल उशिरा धावत असल्याने बस निघून जातात. त्यामुळे प्रवाशांना रिक्षा, खासगी वाहनांनी घर गाठावे लागत आहे. सिग्नल यंत्रणेतील बिघाड कायमस्वरूपी दुरुस्त करावा अन्यथा रेल्वे प्रशासनाला प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा कल्याण-कसारा रेल्वे प्रवासी संघटनेचे राजेश घनगाव यांनी दिला आहे.

Story img Loader