आधार कार्ड संलग्न खाते उघडण्याची विशेष योजना राबविणारी टीजेएसबी ही देशातील सहकारी क्षेत्रातील पहिली बँक ठरली आहे. रिझव्र्ह बँकेचे कार्यकारी संचालक एस. करुप्पासामी यांच्या हस्ते शनिवारी संध्याकाळी टिप-टॉप प्लाझा सभागृहात आयोजित एका समारंभात प्रत्यक्ष आधार कार्ड वापरून बँकेत खाते उघडण्यात आले.
टीजेएसबी बँकेच्या सर्व शाखांमध्ये ही सुविधा उपलब्ध असेल, असेही या वेळी व्यवस्थापनाने जाहीर केले.
रिझव्र्ह बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक ए. उद्गाता, यूआयडीएचे तेज गुप्ता, टीजेएसबी बँकेचे अध्यक्ष विद्याधर वैशंपायन, उपाध्यक्ष भालचंद्र दाते, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश उतेकर आदी याप्रसंगी उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या वतीने सुरुवातीला देशातील ५१ जिल्ह्य़ांमध्ये विविध अनुदाने, शिष्यवृत्ती, वेतन लाभार्थीच्या खात्यामध्ये जमा करणार आहे. यामध्ये राष्ट्रीयीकृत तसेच खासगी बँका पॅनेलवर आहेत.
१ एप्रिल २०१३ पासून एकूण १८ राज्यांमध्ये व १ एप्रिल २०१४ पासून संपूर्ण देशांमध्ये अनुदान वितरण हे आधार कार्डाच्या संलग्न खात्याद्वारे करण्यात येणार आहे. दुर्गम व ग्रामीण भागात सेवा देण्यासाठी व्यवसाय प्रतिनिधी नेमण्याचा प्रस्ताव टीजेएसबीने रिझव्र्ह बँकेला सादर केला आहे.
घरगुती गॅसवरील अनुदान, शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन, शिष्यवृत्ती, महिला व बालकल्याण तसेच विविध शासकीय योजनांचे लाभ आता आधार कार्ड संलग्न खात्याद्वारे दिले जाणार आहेत.

Story img Loader