सत्तेसाठी गेली दोन वर्षे एकमेकांच्या उरावर बसणारे आणि प्रत्येक गोष्टीत शह काटशहाचे राजकारण करीत ठाणेकरांना वेठीस धरणारे महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधक अखेर मनोमिलनासाठी राजी झाले आहेत. त्यासाठी महापालिकेच्या चांगल्या कारभाराचे धडे घेण्याबरोबरच गेल्या दोन वर्षांतील थकवा घालवण्याठी सर्वपक्षीय नगरसेवकांचे वऱ्हाड गोव्याला निघाले आहे. या दौऱ्याचा १६ लाखांचा ‘किरकोळ’ भरुदड अर्थातच जनतेलाच उचलावा लागणार आहे.
ठाणे महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमधील राडा संस्कृतीचे दर्शन गेली दोन वर्षे होत आहे. महापालिकेत सध्या सत्ताधारी शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी-मनसे यांची आघाडी यांचे पक्षीय बलाबल समसमान आहे. त्यामुळे महापौरपदाची निवडणूक असो, स्थायी समिती सभापतीची निवड असो वा चार महिन्यासाठी परिवहन समिती सभापतीची निवड असो, सदस्यांची फितुरी आणि राडेबाजी ठाणेकरांसाठी नित्याचीच झाली आहे. मात्र आता किमान लोकसभा आणि त्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर शह- काटशहाच्या  राजकारणाला काही काळ विश्रांती देण्यासाठी दोन्ही पक्षाातील काही नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातूनच अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेने आयोजित केलेल्या दोन दिवसीय अभ्यास शिबिराचे निमित्त साधत दोन्ही आघाडय़ांमध्ये मनोमीलन घडवून आणले जाणार आहे.
या दौऱ्यासाठी पालिकेतील नेहमीची चौकडी सक्रीय झाली असून या अभ्यास दौऱ्यासाठी महापौर, विरोधी पक्षनेते, सभागृह नेत्यासह सर्वपक्षीय ८०-९० नगरसेवक जाणार आहेत. येत्या ११ आणि १२ फेब्रुवारी दरम्यान पणजीत डेलमॉन या अलिशान हॉटेलमध्य हे प्रशिक्षण होणार आहे. महापलिकेचे कामकाज, महापालिका अधिनियम, प्रश्न, लक्षवेधी आदींबाबत ज्ञान नगरसेवकांना दिले जाणार आहे. या अभ्यासाबरोबरच गोव्याच्या निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांचा लवाजमा १० ते १३ असे चार दिवस गोव्याला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा