ठाणे महापालिकेच्या मुख्यालयातील शहर विकास विभागातील संगणकावरील गोपनीय माहिती एका बडय़ा विकासकाचे दोन प्रतिनिधी हाताळत असल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. बुधवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला. शहर विकास विभागात पूर्वपरवानगीशिवाय तिऱ्हाईताला प्रवेशमनाई असताना हे घडलेच कसे, याची चर्चा आता पालिका वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, या प्रकाराची गंभीर दखल घेत महापौर संयज मोरे यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. तर नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालकांनी सर्वसाधारण सभेपुढे अहवाल सादर करावा अशी मागणी सभागृह नरेश म्हस्के यांनी केली आहे.
ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागात महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच रीतसर वेळ घेऊन येणाऱ्या अभ्यागतांशिवाय कोणालाही प्रवेश दिला जात नाही. या विभागात बिल्डर आणि त्यांच्याशी संबंधित प्रतिनिधींचा मुक्त वावर असतो, अशा स्वरूपाच्या तक्रारी पुढे येत होत्या. त्यामुळे तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांनी या विभागात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. तसेच कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त कुणीही या विभागात थांबू नये, असे आदेश काढले.
राजीव यांची बदली झाल्यानंतर शहर विकास विभागात पुन्हा तेजीचा हंगाम सुरू झाल्याची चर्चा सुरू असतानाच बुधवारी रात्री आठच्या सुमारास एका बडय़ा बिल्डरचे दोन प्रतिनिधी संगणकावरील माहिती हाताळताना आढळून आले. काँग्रेसचे गटनेते विक्रांत चव्हाण यांना यासंबंधीची माहिती मिळताच त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड तेथे थडकले आणि जोरदार वादावादी सुरू झाली. आम्हाला बघून संगणकावरील माहिती हाताळणारे हे प्रतिनिधी पळून गेले, असा आरोप आव्हाड आणि चव्हाण यांनी केला असून हा सगळा कारभार संशयास्पद असल्याने चौकशीची मागणी केली आहे. बिल्डरांचे प्रतिनिधी कार्यालयात असताना शहर विकास विभागातील कोणते अधिकारी उपस्थित होते याची माहिती अद्याप पुढे आलेली नाही.
शहर विकास विभागात काही अधिकारी रात्री उशिरापर्यंत काम करण्यात दंग होते. त्यांच्या उपस्थितीत तिऱ्हाईत व्यक्ती तेथे आल्या होत्या. मात्र, कोणताही गैरव्यवहार झालेला नाही.
– प्रदीप गोहिल, शहर विकास विभागाचे प्रमुख

Story img Loader