मुंबई : मुंबईतील पहिली मेट्रो मार्गिका अर्थात मेट्रो १ मार्गिका वर्सोवा-अंधेरी-घाटकोपरदरम्यान धावते. आता मात्र लवकरच या महिनाअखेरपासून घाटकोपर ते अंधेरी अशी थेट मेट्रो सेवा सुरु होणार आहे. वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मार्गिकेवरील एकूण दैनंदिन प्रवासी संख्येच्या ८८ टक्के प्रवासी हे घाटकोपर ते अंधेरीदरम्यान प्रवास करणारे आहेत. त्यामुळे घाटकोपर ते अंधेरीदरम्यान थेट मेट्रो सुरु करण्याचा निर्णय मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) घेतला आहे. त्यादृष्टीने मेट्रो गाड्यांच्या चाचण्या सध्या सुरु असून त्या यशस्वी झाल्यानंतर म्हणजे मार्चअखेरपासून घाटकोपर ते अंधेरी अशी थेट मेट्रो धावणार आहे.
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो १ मार्गिका २०१४ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाली आहे. सुरूवातीला त्यासाठी प्रवाशांचा प्रतिसाद कमी दिसत असला तरी आता या मार्गिकेला आता प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. मेट्रो १ वरील दैनंदिन प्रवासी संख्या सध्या ४ लाख ८० हजार अशी आहे. त्यातही घाटकोपर ते अंधेरीदरम्यान प्रवासी अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो १ मार्गिकेवर धावणाऱ्या मेट्रो फेऱ्यांमधील एकूण प्रवासी संख्येच्या ८८ टक्के प्रवासी हे घाटकोपर ते अंधेरी दरम्यान प्रवास करणारे आहेत. त्यामुळे गर्दीच्या वेळी अर्थात सकाळी आणि सायंकाळी घाटकोपर ते अंधेरी दरम्यान खूप गर्दी असते आणि त्यानंतर मात्र पुढे अंधेरी ते वर्सोव्या दरम्यान मेट्रो गाड्या बऱ्यापैकी रिकाम्या असतात. या सर्व बाबींचा विचार करून एमएमओपीएलने गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी घाटकोपर ते अंधेरीदरम्यान थेट मेट्रो सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती एमएमओपीएलमधील सूत्रांनी दिली. त्यासाठी सध्या एमएमओपीएलकडून मेट्रो गाड्यांच्या चाचण्या सुरु करण्यात आल्या आहेत. त्या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर अर्थात मार्चअखेरपर्यंत घाटकोपर ते अंधेरी थेट मेट्रो धावण्याची शक्यता आहे.
गर्दी नियंत्रणासाठी घाटकोपर ते अंधेरी थेट मेट्रो सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांची सोय होणार आहे. घाटकोपर ते अंधेरी दरम्यान फेऱ्या वाढणार असल्यानेही प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. दोन मेट्रो गाड्यांमधील अंतर कमी होण्यास मदत होणार आहे. घाटकोपर ते अंधेरी आणि घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा अशा फेऱ्या या पुढे मेट्रो १ मार्गिकेवर असतील, असेही सूत्रांनी सांगितले.