मुंबईतील शीव रुग्णालयात मुलाला वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश देण्याच्या नावाखाली ५९ वर्षीय व्यक्तीची दोन कोटी १४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तिघांविरोधात ट्रॉम्बे पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा- एसटीची २१ ऑक्टोबरपासून १० टक्के हंगामी भाडेवाढ; शिवनेरी व अश्वमेध सेवेला भाडेवाढीतून वगळले

दोन आरोपींनी शीव रुग्णालयात एमएसची (मास्टर्स ऑफ सर्जन) जागा मिळवून देण्याच्या बहाण्याने २८ लाखांची फसवणूक केली. त्यानंतर तिसऱ्या आरोपीने फसवणूक केलेल्या दोघांचा शोध घेऊन त्यांच्याकडून रक्कम मिळवून देतो असे सांगत तक्रारदाराची आणखी एक कोटी ८६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा- दोन वर्षांनंतर पुन्हा ‘लोकसत्ता लोकांकिका’

तक्रारदार अभियंता सल्लागार असून त्यांना दोन मुले आहेत. मोठा मुलगा ब्राझीलमध्ये नोकरी करतो. धाकटा मुलगा कर्नाटकातील रायचूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात एमएसचे (मास्टर्स ऑफ सर्जन) शिक्षण घेत आहे. तक्रारदाराची पत्नीही डॉक्टर आहे. तक्रारदाराच्या पत्नीने फेब्रुवारी २०२० मध्ये एका इंग्रजी वृत्तपत्रात भारतातील प्रतिष्ठीत संस्थांमधील वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाबाबत जाहिरात वाचली होती. जाहिरातीत दिलेल्या क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला. त्यावेळी त्यांच्याशी निखिल निरंजन नावाच्या व्यक्तीने संवाद साधला. निरंजनने २४ फेब्रुवारी २०२० रोजी त्याचे सहकारी सुनील कुमार यांच्यासह तक्रारदाराच्या घरी भेट दिली. त्यावेळी शीव रुग्णालायात आपली चांगली ओळख आहे आणि तेथील एका डॉक्टरच्या मदतीने एमएसची (मास्टर्स ऑफ सर्जन) जागा निश्चित मिळवू शकतील, असे सांगितले.

हेही वाचा- बालकांसाठी बी जे वाडिया रुग्णालयाची ‘तितली’ पँलेएटिव्ह होम केअर सेवा सुरू

या कामासाठी आरोपींनी २८ लाख रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने ती रक्कम दिल्यानंतर त्यांनी रुग्णालयाला भेट दिली. मात्र, तिथे चौकशी केल्यावर आपली फसवणूक झाल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आले. या घटनेनंतर रोहन हेमंत नावाच्या तिसऱ्या आरोपीने तक्रारदाराशी संपर्क साधला. पोलिसांच्या मदतीने निरंजन आणि कुमारचा शोध घेऊ शकतो, असे त्याने सांगितले. या कामासाठी त्याने २५ हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर आरोपीने विविध कथा रंगवून तक्रारदार यांच्याकडून एक कोटी ८६ लाख रुपये घेतले. या आरोपीने ११ ऑक्टोबर रोजी पुन्हा दूरध्वनी करून आणखी एक लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने याप्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांकडे तक्रार केली. याप्रकरणी पोलिसांनी मोठ्या शिताफीने रोहन हेमंतला अटक केली आहे.

Story img Loader