विविध घोटाळ्यांशी संबंधित चौकशी समित्यांचे अहवाल दडपून ठेवणारी ‘रॅकेट्स’ सध्या मंत्रालयात जोरात कार्यरत असल्याचा गौप्यस्फोट शिक्षणमंत्री यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केला. त्याचप्रमाणे ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागातील घोटाळ्याप्रकरणी येत्या दोन महिन्यांत चौकशी पूर्ण करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची घोषणाही त्यांनी या वेळी केली.
ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागातील कर्मचारीच अधिकाऱ्यांच्या बनावट सह्य़ा करून शासनास पत्र, प्रस्ताव सादर करीत असल्याबद्दल रामनाथ मोते यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरील चर्चेदरम्यान तावडे यांनी हा गौप्यस्फोट केला. केवळ शिक्षण विभागातच नव्हे तर मंत्रालयातील सर्वच विभागांत विविध प्रकरणांशी संबंधित अहवाल दडपून ठेवणारे किंवा लांबणीवर टाकणारे रॅकेट कार्यरत आहेत. विविध अनियमिततांची चौकशी करण्यासाठी समित्या नेमल्या जातात. मात्र, संबंधित दोषी अधिकारी सेवानिवृत्त होईपर्यंत या टोळ्या चौकशी समित्यांचे अहवालच दाबून लांबणीवर टाकतात. अशा टोळ्या मंत्रालयात सर्वच विभागांत कार्यरत आहेत. असे रॅकेट चालविणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करणार असल्याचा इशाराही तावडे यांनी दिला.
दरम्यान, ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागातील कर्मचाऱ्यांनीच अधिकाऱ्यांच्या बनावट सह्य़ा करून गरप्रकार करीत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्याबाबत चौकशी करण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांना सांगण्यात आले होते. मात्र आठ महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही अजून अहवाल आलेला नसून आता अन्य विभागांतील उच्च अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जाईल आणि येत्या दोन महिन्यांत या प्रकरणी दोषींवर कारवाई केली जाईल, असेही तावडे यांनी सांगितले.

Story img Loader