मुळचे सातारा येथील पवार नावाच्या ३३ वर्षीय व्यावसायिकाने आपल्या बँकॉक वाऱ्या पत्नीपासून लपविण्यासाठी पासपोर्टशी छेडछाड केली होती. त्यानंतर शनिवारी (१३ जुलै) पुन्हा एकदा बँकॉकला जात असताना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक असलेल्या सहार पोलिसांनी त्यांना अटक केली. इमिग्रेशन ब्युरोच्या अधिकारी आस्था मित्तल यांनी व्यावसायिकाच्या पासपार्टची तपासणी केली असता त्यांना संशय आला, त्यानंतर त्यांनी त्याची माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांना दिली.

टाइम्स नाऊने दिलेल्या बातमीनुसार, अटकेत असलेले व्यावसायिक बँकॉकला जाण्यासाठी नियोजित विमान पकडण्यासाठी विमानतळावर गेले होते. त्याआधी नियमित तपासणीदरम्यान त्यांच्या पासपोर्टमध्ये काही तफावत दिसून आली. इमिग्रेशन अधिकाऱ्याने पासपोर्टची व्यवस्थित छाननी केली असता त्यातील मूळ १२ पाने काढून त्याजागी कोरी पाने लावले असल्याचे उघड झाले.

Anant Ambani Wedding: “जय गनेस” म्हणत मराठी अभिनेत्याची अनंत अंबानीच्या लग्नसोहळ्यावर मार्मिक पोस्ट, म्हणाला, “लग्नातील सेट, कपडे भाड्याने…”

या प्रकरणाची माहिती देताना सहार पोलिसांनी सांगितले की, आरोपी व्यावसायिक बँकॉकला जाण्यासाठी आपले नियोजित विमान AI-330 पकडण्यासाठी विमानतळावर आले होते. यावेळी त्यांनी आपला पासपोर्ट तपासणीसाठी सादर केला. तपासणी करत असताना त्यातील १२ पाने गहाळ असल्याचे दिसून आले. यानंतर पोलिसांनी संबंधित व्यावसायिकाची कसून चौकशी केली असता त्यांनी २०२३ आणि २०२४ मध्ये आपल्या पत्नीला न सांगता मित्रांसमवेत थायलंडवारी केली असल्याचे सांगितले. “आपल्या पत्नीपासून थायलंडची ट्रीप लपवायची होती. त्यामुळेच मी पासपोर्टला नवी पाने जोडली”, अशी कबुली व्यावसायिकाने दिली.

त्यानंतर आता पुन्हा थायलंडला जायचे असल्याने संबंधित व्यावसायिकाने नवी कोरी पाने पासपोर्टला जोडली. यानंतर आता पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम ३१८ (४) नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच भारतीय पासपोर्ट कायदा, १९६७ मधील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी पवार हा लॉजिस्टिकचा व्यवसाय करत असून पदवीधर आहे. तो आपल्या कुटुंबासह सातारा येथे राहत असून सध्या त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सहार पोलिसांनी सांगितले, “यावेळी पवार एका क्लाईंटसह थायलंडला अधिकृत दौऱ्यावर जात होता. या दौऱ्याबाबत त्याच्या पत्नीलाही माहिती होती. जर याआधीच्या ट्रीपबाबत त्याने पत्नीला विश्वासात घेऊन सांगितले असते तर त्याची ही अटक टळली असती. आता थेट सोमवारी त्याला न्यायालयात सादर केले जाणार असून तेव्हाच जामिनावर सोडण्याबद्दल सुनावणी होईल.”

विमानतळ अधिकाऱ्याचा चावा घेणाऱ्या महिलेला अटक

सहार पोलिसांनी एका वेगळ्या प्रकरणात ४३ वर्षीय महिलेला अटक केली. मुंबई विमानतळावर सामानाची तपासणी करत असताना सदर महिलेने विमानतळ अधिकाऱ्याशी धक्काबुक्की केली. महिलेच्या हँडबॅगेत संशयास्पद गोळ्या आढळ्यानंतर अधिकाऱ्याने चौकशी केली असताना महिलेच्या रागाचा पारा चढला आणि तिने अधिकाऱ्याशी हुज्जत घातली. मुळची चेन्नईची असलेली ही महिला मस्कटहून मुंबई विमानतळावर आली होती. तिथे तपासणीदरम्यान तिने राडा घातला तसेच अधिकाऱ्याचा चावा घेतल्यामुळे सहार पोलिसांनी तिला अटक केली.