उच्च न्यायालयाचे पालिकेला आदेश
‘मिलीबग’ या कीटकांमुळे मुंबईत झपाटय़ाने मरत असलेल्या झाडांसाठी तातडीने पावले उचला, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी पालिकेला दिले.
खार ते सांताक्रूझ (पश्चिम) विभागातील अंदाजे ११६ झाडे ही ‘मिलीबग’ या कीटकांमुळे मरत असल्यामुळे त्यापासून झाडांना वाचविण्यासाठी पालिकेला आदेश देण्याची मागणी जनहित याचिकेद्वारे करण्यात आली आहे. झोरू मथेना यांनी ही याचिका केली असून न्यायमूर्ती विद्यासागर कानडे आणि न्यायमूर्ती रेवती ढेरे यांच्या खंडपीठासमोर त्यावर सुनावणी झाली. त्या वेळेस पश्चिम द्रुतगती महामार्गावरील कालिना ते बोरिवली या पट्टय़ातील १०० झाडांना या कीटकाची लागण झाली आहे. त्यामुळे एकूण मुंबईतील हा आकडा अधिक असू शकतो. या कीटकांमुळे मरणारी झाडे आणि हरित पट्टा वाचवण्यासाठी पालिकेतर्फे प्रयत्न केले जात नाही. त्यामुळे भविष्यात झाडेही दिसणार नाहीत, असा दावा याचिकेत करण्यात आला होता.

मिली बग म्हणजे काय?
मिली बग हे कीटक जगभरात उष्ण व दमट प्रदेशात आढळतात. हिरव्या वनस्पतींमधील रस शोषून घेणाऱ्या या कीटकांचा जास्वंद, ऊस यांसारख्या वनस्पतींना प्रादुर्भाव होतो. या कीटकांना खाणाऱ्या लेडी बग या कीटकांचा उपगोय कीटकनाशक म्हणून केला जातो.

Story img Loader