परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांची मूळ माहिती आणि तांत्रिक किंवा अन्य अडचणीच्या काळात लागणारा तिचा ‘बॅकअप’ या दोन्ही गोष्टी एकाच ‘हार्डडिस्क’वर ठेवण्याचा घोळ केल्याने ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’पुढील व्हायरसचा प्रश्न जास्त जटिल झाला आहे.
तांत्रिक अडचणीमुळे संगणकावरील मूळ माहितीला धक्का लागू नये किंवा ती कायमची जाऊ नये म्हणून तिचा बॅकअप घ्यायची पद्धत आहे. हा बॅकअप साधारणपणे दुसऱ्या हार्डडिस्कवर किंवा पेनड्राईव्ह अथवा सीडीमध्ये संग्रहित केला जातो. जेणेकरून मूळ माहितीला तांत्रिक अडचणींमुळे धक्का बसल्यास बॅकअपमधून ही माहिती पुन्हा मिळविता येऊ शकते. पण, एमपीएससीने राज्य सेवा पूर्व परीक्षेकरिता उमेदवारांकडून मागविलेल्या ऑनलाइन अर्जातील मूळ माहिती आणि त्याच्या बॅकअपची माहिती एकाच हार्डडिस्कवर संग्रहित केल्याने घोळ झाला. कारण, या हार्डडिस्कमध्येच व्हायरस आल्याने या दोन्ही प्रकारच्या माहितीला धक्का पोहोचला आहे. परिणामी, उमेदवारांकडून पुन्हा एकदा माहिती मागवून हॉलतिकीट तयार करण्याचे द्राविडी प्राणायाम एमपीएससीला करावे लागत आहेत.
७ एप्रिलच्या परीक्षेकरिता हॉलतिकीटच्या प्रतिक्षेत असलेले उमेदवार गेला आठवडाभर एमपीएससीच्या संकेतस्थळावर जात आहेत. शनिवारी संकेतस्थळ काम करत नसल्याने उमेदवारांनी या प्रकाराची तक्रार एमपीएससीच्या कार्यालयात केली. त्यामुळे, एमपीएससीच्या तांत्रिक बाजू बरोबरच संकेतस्थळाच्या देखभालीची जबाबदारी सांभाळणाऱ्या ‘वास्ट इंडिया लिमिटेड’ या कंपनीशी संपर्क साधून विचारणा केली असता संकेतस्थळ देखभालीच्या कारणाकरिता काही काळ बंद ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. सोमवापर्यंतही संकेतस्थळ पूर्ववत न झाल्याने एमपीएससीने कंपनीला लेखी पत्र लिहून विचारणा केली. तेव्हा कुठे कंपनीने व्हायरसची बाब उघड केली, असे एमपीएससीतील सूत्रांनी सांगितले.
मूळ आणि बॅकअप माहिती संग्रहित असलेल्या हार्डडिस्कमध्येच व्हायरस शिरल्याने हा घोळ झाल्याचे ‘एमपीएससी’चे अध्यक्ष सुधीर ठाकरे यांनी स्पष्ट केले. या माहितीचा काही भाग करप्ट होऊन तिचे ‘जम्बलिंग’ होत आहे. अर्थात एमपीएससीकडे उमेदवारांची काही माहिती उपलब्ध आहे. ही उपलब्ध माहिती व उमेदवारांनी नव्याने भरलेली माहिती ‘टॅली’ करून त्या आधारे एमपीएससी हॉलतिकीट उपलब्ध करून दिले जाणार आहे. पण, उमेदवारांना ही जुजबी माहिती देतानाही मोठय़ा अडचणींना सामोरे जावे लागते
आहे. परीक्षा चार दिवसावर आलेली असताना अभ्यासाचा सराव करायचा सोडून हजारो परीक्षार्थी संगणकाला चिकटून आहेत. कारण तासनतास प्रयत्न करूनही एमपीएससीच्या संकेतस्थळावर माहिती भरता येत नाही.
एमपीएससीच्या कार्यालयात संपर्क साधायचा तर तोही सतत एन्गेज्ड येतो आहे. त्यामुळे, अनेक चिंताग्रस्त उमेदवार माहिती अपडेट करण्यासाठी मुंबईतील एमपीएससीच्या कार्यालयाकडे धाव घेत आहेत.
त्याच ‘हार्डडिस्क’वर बॅकअप घेणे एमपीएससीला भोवले !
परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांची मूळ माहिती आणि तांत्रिक किंवा अन्य अडचणीच्या काळात लागणारा तिचा ‘बॅकअप’ या दोन्ही गोष्टी एकाच ‘हार्डडिस्क’वर ठेवण्याचा घोळ केल्याने ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’पुढील व्हायरसचा प्रश्न जास्त जटिल झाला आहे.
First published on: 04-04-2013 at 03:53 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: To take back up on same hard disk this became problematic for mpsc