शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे हे एकमेकांविरोधात माहिती व मुद्दे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर.आर. पाटील यांना देत होते आणि त्यानंतर आबांची तोफ विधानसभेत धडाडायची, असा गौप्यस्फोट माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत केला. तंबाखूमुक्त अभियान राबविले गेले, तर ती आर. आर. पाटील यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
आर.आर. पाटील यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत शोकप्रस्ताव मांडला. सर्वपक्षीय नेत्यांन पाटील यांची साधी राहणी, प्रामाणिकपणा, हजरजबाबीपणा, संवेदनशीलता, हुशारी या गुणांची वाखाणणी केली. अजित पवार यांनी भाषणात युती सरकारच्या काळातील काही अनुभव सांगितले. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री मुंडे यांच्याबरोबर त्यांच्या ताजमहाल हॉटेलमध्ये बैठका व्हायच्या आणि ते एकमेकांविरोधातील माहिती पाटील यांना देत असत. त्याचा उपयोग करून आबा हे तोफ डागत असत, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला.
डॉक्टरांनी आर. आर. पाटील यांचा आजार लपवून ठेवण्याच्या डॉक्टरांच्या भूमिकेला भुजबळ यांनी आक्षेप घेतला. मला वाद निर्माण करायचा नाही. पण पाटील यांनी काही काळापूर्वी कर्करोगाचे निदान होऊनही डॉक्टरांना आपल्या आजाराची माहिती कोणालाही न देण्याच्या सूचना दिल्या, तरी त्यांनी आमच्यासारख्या एखाद्या नेत्याला सांगितले असते, तर आणखी उपचारांसाठी वेळीच धावपळ करता आली असती. कदाचित त्यांचा जीव वाचविता आला असता. रुग्णाचा जीव वाचविणे, हे डॉक्टरांचे आद्यकर्तव्य आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला आधी कल्पना द्यायला हवी होती, असे भुजबळ म्हणाले.
आबांना ‘आरोपमुक्त’ करा
मुंबईत अतिरेकी हल्ला झाल्यानंतर ‘बडे बडे शहरों में ऐसी छोटी-छोटी घटनाऐं होती है,’ अशा आशयाचे वक्तव्य आबांनी केल्यानंतर गदारोळ झाला होता. त्यांना राजीनामाही द्यावा लागला होता. पण आपण असे वक्तव्य केले नव्हते, असे त्यांचे म्हणणे होते. याबद्दलचे शल्य त्यांच्या मनात कायम होते. त्यांना आता तरी या वक्तव्याच्या ‘आरोपातून’ मुक्त करावे, अशी भावना अजित पवार यांनी व्यक्त केली.
विधान परिषदही हळहळली
आर. आर. पाटील ऊर्फ आबा यांच्या अकाली निधनामुळे विधान परिषदेतही सर्वच पक्षांच्या सदस्यांनी हळहळ व्यक्त केली. तर पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येबद्दल सभागृहात चिंता व्यक्त करण्यात आली. राजकीय कार्यकर्त्यांच्या संकटकाळात त्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी आर.आर.पाटील यांच्या नावाने एक विश्वस्त संस्था स्थापन करावी, अशी सूचना सभापती शिवाजीराव देशमुख यांनी मांडली. विधिमंडळातील आबांच्या भाषणांचे पुस्तक प्रकाशित करावे, अशी मागणी जयंत पाटील व कपिल पाटील यांनी केली.
‘तंबाखूमुक्त महाराष्ट्र हीच आर. आर. पाटील यांना श्रद्धांजली!’
शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे हे एकमेकांविरोधात माहिती व मुद्दे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर.आर. पाटील यांना देत होते आणि त्यानंतर आबांची तोफ विधानसभेत धडाडायची, असा गौप्यस्फोट माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत केला.
आणखी वाचा
First published on: 10-03-2015 at 04:45 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tobacco free maharashtra would be condolence to rr patil