* अर्ज भरण्याच्या धावपळीमुळे परीक्षार्थीची दमछाक
* परीक्षा ७ एप्रिललाच घेण्याचा आयोगाचा प्रयत्न
संकेतस्थळात शिरलेल्या ‘व्हायरस’मुळे अडचणीत आलेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) राज्यसेवा पूर्वपरीक्षा ठरलेल्या वेळेनुसार म्हणजेच, ७ एप्रिललाच घेण्यावर आयोग ठाम आहे. आधी अर्ज केलेल्या सर्व परीक्षार्थीना प्रवेशपत्र मिळावे, यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरू आहेत. मात्र, सव्वा तीन लाखपैकी अवघ्या ६० हजार परीक्षार्थीना बुधवारी अर्ज भरता आले. त्यामुळे आज, गुरुवारी एकूण परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षेबाबत निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज यांनी विधानसभेत स्पष्ट केले.
आयोगाच्या संकेतस्थळाला ‘व्हायरस’ चा फटका बसल्याने राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी बसलेल्या सर्व उमेदवारांची माहिती परीक्षेच्या तोंडावरच नष्ट झाली आहे. उमेदवारांनी गुरुवार सायंकाळी चापर्यंत ही माहिती पुन्हा भरावी, असे आयोगाने सांगितले आहे. राज्यभरात २६५ पदांसाठी ९८४ केंद्रांवर राज्यसेवा पूर्वपरीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी सव्वा तीन लाख उमेदवार बसले आहेत. त्यापैकी ६० हजार उमेदवारांनी बुधवारी सायंकाळपर्यंत माहिती भरली आहे. मात्र, एकाच वेळी लाखो उमेदवार माहिती भरत असल्यामुळे संकेतस्थळ क्रॅश होत आहे, त्यामुळे परीक्षार्थीची दमछाक होत आहे.
या पाश्र्वभूमीवर, परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी विधानभवनापासून राज्यभर करण्यात येत आहे. मात्र, राज्य सरकारने याबाबत गुरुवारी निर्णय घेण्याचे जाहीर केले आहे. परीक्षा पुढे ढकलण्याची आवश्यकता नाही, असे आयोगाचे मत आहे. तरीही राज्य शासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. परीक्षार्थीचे नुकसान होऊ नये, ही शासनाची स्पष्ट भूमिका आहे. त्यामुळे गुरुवारी आढावा घेऊन याबाबत निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले.
अॅप्लिकेशन अॅड्रेससाठी संपर्क
ज्या उमेदवारांना अजूनही ‘अॅप्लिकेशन अॅडेस’ मिळालेला नाही. त्यांनी (०२२) – २२६७०१४८ / २२६७०२४८ /२२६७०२१० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
उमेदवारांना त्यांची माहिती पुन्हा भरण्यासाठी गुरुवार सायंकाळपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर सर्व परिस्थितीचा
आढावा घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येईल.
सुधीर ठाकरे , अध्यक्ष, महाराष्ट्र लोकसेवा आयोग
आयोगाने केलेल्या उपाययोजना
* उमेदवारांनी ऑनलाइन माहिती देताना नाव, जन्मतारीख आणि कॅटेगिरीइतकीच माहिती भरावी, फोटो आणि स्वाक्षरी न भरण्याचे आवाहन
* मुंबईतील उमेदवार आयोगाच्या कार्यालयामध्येही आपली माहिती देऊ शकतात
* आयोगाकडे असलेली माहिती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपलब्ध करून देणार. फोटो, ओळखपत्र आणि परीक्षा शुल्क भरल्याची पावती दाखवल्यावर तेथून प्रवेशपत्रही मिळणार
* विद्यार्थ्यांना त्यांचे केंद्र एसएमएस आणि ईमेलच्या माध्यमातून कळवण्यात येतील
* परीक्षेच्या दिवशी परीक्षाअर्ज आणि शुल्क भरल्याची पावती आणि ओळखपत्र दाखवल्यास परीक्षेस बसता येणार
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा