स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) प्रक्रियेला कडाडून विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांनी आता आणखीनच आक्रमक भूमिका घेतली आहे. एलबीटीही नको आणि जकातही नको अशी नवी मागणी व्यापाऱ्यांनी केली असून हिंमत असेल तर सरकारने ‘एस्मा’ लावून दाखवावाच अशी आव्हानाची भाषाही केली आहे. संघटित व्यापाऱ्यांनी आज, गुरुवारी जेलभरो आंदोलनाचीही घोषणा केली आहे. तसेच एलबीटीखाली नोंद न करण्याबरोबरच व्हॅट भरणाही तहकूब करण्याचे आवाहन व्यापारीवर्गाने केले आहे. मात्र, रिटेल व्यापाऱ्यांनी या आंदोलनातून फारकत घेतल्याने व्यापाऱ्यांच्या एकजुटीला तडा गेल्याचे चित्र आहे.