Mumbai Monsoon Update: मुंबईसह राज्यभरात ठिकठिकाणी वरुणराजाने दमदार हजेरी लावली आहे. पुढच्या २४ ते ४८ तासांमध्ये मुंबईत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई, मध्य महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागात पुढील २४ ते ४८ तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे लांबलेला पाऊस आता सक्रिय झाला आहे. घामाच्या धारांनी हैराण झालेले मुंबईकर सुखावले आहेत.
बदलापूरजवळ मालगाडीच्या इंजिनात बिघाड
मध्य रेल्वेच्या बदलापूर आणि अंबरनाथ दरम्यानच्या अपमार्गावर मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाल्याने अप मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे लोकल आणि मेल एक्सप्रेस गाड्या खोळंबल्या आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आणि सकाळी रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने रेल्वे स्थानकांमध्ये प्रवासी खोळंबले आहेत.
सोमवारी पहाटे आणि रविवारी रात्री मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर भागात जोरदार पाऊस पडला आहे. तसंच विविध जिल्ह्यांमध्येही पाऊस पडल्याने बळीराजाही सुखावला आहे. आता मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसाच्या सरी कोसळू शकतात असा अलर्ट हवामान खात्याने आणि मुंबई महापालिकेनेही दिला आहे. मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल आणि काही प्रमाणात मुसळधार सरी कोसळतील असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
ठाण्यात ४० फुटी भिंत कोसळली
मुसळधार पावसामुळे ठाण्यातल्या व्हिव्हियाना मॉलच्या मागे असलेली चाळीस फुटी भिंत कोसळली आहे. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही अशी माहिती ठाणे महापालिकेने दिली आहे.
बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या स्थितीमुळे मोसमी पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई, ठाणे, मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर पुढच्या ४८ तासांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची चिन्हं आहेत. जोरदार पावसामुळे मुंबईतल्या सखल भागांमध्ये पाणी साठल्याचंही पाहण्यास मिळालं. मुंबईतल्या विविध भागांमध्ये चांगला पाऊस पडतो आहे. वसई, विरार आणि मीरा भाईंदरमध्येही पावसाच्या सरी कोसळल्या. दक्षिण मुंबईतही रिमझिम पाऊस पडतो आहे.