पनवेल-कळंबोळी येथील आश्रमशाळेतील गतिमंद मुलींवर सामूहिक बलात्कार आणि लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आश्रमशाळेचा संस्थापक रामचंद्र करंजुले (५४) याच्यासह सहा जणांना विशेष न्यायालयाने बुधवारी दोषी ठरविले. गुरुवारी आरोपींच्या शिक्षेचा निर्णय न्यायालय देणार असून करंजुले याला न्यायालयाने खुनाच्या गुन्ह्यात दोषी धरल्याने त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी सरकारी वकिलांकडून करण्यात आली. या खटल्यातील अन्य चार आरोपींची न्यायालयाने पुराव्याअभावी सुटका केली.
आश्रमशाळेतील तीन अल्पवयीन मुलींसह एकूण पाच गतिमंद मुलींवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. यातील एक मुलगी सामूहिक बलात्कारानंतर मृत्युमुखी पडली. ‘कळंबोळी येथील कल्याण महिला बाल सेवा’ या खासगी आश्रमशाळेतील हा प्रकार संस्थापकाच्या वरदहस्तानेच घडल्याचे उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली होती. सरकारी पक्षाच्या दाव्यानुसार, आश्रमशाळेतील एकूण १९ मुलींवर तीन आरोपींनी बलात्कार केला.
या १९ मुलींचे महानगरदंडाधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदविण्यात आले, तर त्यातील तिघींनी न्यायालयासमोरही साक्ष दिली. न्यायालयात साक्ष देणाऱ्या तिघींपैकी एक गतिमंद असून दोघी मूकबधीर आहेत. त्यांनी सांकेतिक भाषेद्वारे आरोपींची ओळख पटवली.
करंजुले याला न्यायालयाने खून, बलात्कार आणि सामूहिक बलात्कार या आरोपांमध्ये दोषी धरले आहे.

Story img Loader