मुंबई आणि उपनगरात शनिवारीही मुसळधार पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी प्रामुख्याने उपनगरांत जास्त पाऊस पडला होता तर शनिवारी पावसाने शहरातही जोरदार सरींचा वर्षांव केला. मान्सूनच्या सुरुवातीलाच सलग सुरू असलेल्या पावसामुळे आतापर्यंत मुंबई शहरात सरासरीपेक्षा अडीचपट तर उपनगरात जवळपास तिप्पट पाऊस झाला आहे. येत्या दोन दिवसांत म्हणजेच रविवारी आणि सोमवारी मुंबई परिसरात वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
दिवसभरात मुंबई शहरात ६० मिमी तर उपनगरात ४४.५ मिमी पावसाची नोंद झाली. तर शुक्रवार रात्रीपासून शनिवारी रात्री नऊपर्यंतच्या २४ तासांत शहरात एकूण ६७.४ मिमी तर उपनगरात ५५ मिमी पावसाची नोंद झाली. यंदा मुंबईत १५ जूनपर्यंत सरासरीपेक्षा अडीच ते तीनपट जादा पाऊस पडला आहे. १५ जूनपर्यंत मुंबई शहरात सरासरी १६१ मिमी तर उपनगरात १४६ मिमी पाऊस पडतो. पण यावर्षी आतापर्यंत शहरात ३९९.३ मिमी तर उपनगरात ५१६.९ मिमी एकूण पाऊस पडला .शनिवारी शहरात कमाल २९.४ तर किमान २५.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. तर उपनगरात कमाल २९ अंश आणि किमान २२.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. शनिवारीही नेहमीप्रमाणे पावसानंतर ठिकठिकाणी पाणी साचले. सुदैवाने रेल्वेसेवा कोलमडण्याची वा वाहतुकीची मोठी कोंडी होण्याची घडलेली नाही. मात्र, गेल्या २४ तासांत अंधेरीत राजेश कुमार यादव (३५) आणि मालाड येथे एका मुलाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. पत्रे टाकत असताना विजेचा धक्का बसल्याने यादव यांचा मृत्यू झाला. तर अक्सा येथे एक मुलगा बुडाल्याचे वृत्त आहे. पण त्याचा तपशील अद्याप हाती आलेला नाही.
धरणांच्या पातळीत दोन टक्के वाढ
राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या दमदार पावसामुळे गेल्या दोन दिवसांत धरणांच्या पाण्याच्या पातळीत दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे. पावसामुळे दुष्काळाची तीव्रताही कमी झाली असून अनेक ठिकाणच्या चारा छावण्याही बंद करण्यात आल्याचे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.
रायगड जिल्ह्य़ात आतापर्यंत १४५ मिमी, ठाणे १६४,  सिंधुदुर्ग ११४,  नाशिक १६४, धुळे २४०, जळगांव १४८,  नगर १६१, सातारा २००, सांगली १७३, औरंगाबाद १२३ मिमी पाऊस पडला. त्यामुळे दुष्काळाची तीव्रता कमी झाल्याने सरकारने सुटकेचा नि:श्वास सोडला असून जनावरांची संख्या घटल्याने दुष्काळी भागातील चारा छावण्या हळूहळू बंद करण्यात येत आहेत.
पाणी साठय़ात वाढ
मराठवाडय़ात केवळ ३ तर नाशिक विभागात ८ टक्के पाणीसाठा होता, तर राज्यात १२ टक्के पाणीसाठा होता. मात्र सुदैवाने मान्सूनचे वेळेवर आगमन होवून समाधानकारक पाऊस सुरू झाला. धरणांच्या परिसरात चांगला पाऊस होत असल्याने धरणांचा पाणीसाठा १४ टक्क्यांवर पोहोचला आहे.
अमरावती विभागातील धरणांच्या पाण्याच्या साठय़ात ५ टक्क्यांनी, नाशिक विभागातील पाणीसाठय़ात ४ टक्क्यांनी, तर कोकण, पुणे आणि नागपूर विभागांतील धरणांच्या पाणीसाठय़ात एक ते दोन टक्क्यांची वाढ झाली आहे.